चारगावचे तत्काळ पुनर्वसन करा
By Admin | Updated: February 26, 2015 00:47 IST2015-02-26T00:47:32+5:302015-02-26T00:47:32+5:30
तालुक्यातील चारगाव या गावाला वेकोलिच्या ब्लास्टींगमुळे धोका निर्माण झालेला आहे. याचा प्रत्यय चारगाव येथील एका १५ वर्षीय मुलीचा भिंत कोसळून दुर्दैवी अंत झाल्याच्या दुर्घटनेतून आला आहे.

चारगावचे तत्काळ पुनर्वसन करा
भद्रावती : तालुक्यातील चारगाव या गावाला वेकोलिच्या ब्लास्टींगमुळे धोका निर्माण झालेला आहे. याचा प्रत्यय चारगाव येथील एका १५ वर्षीय मुलीचा भिंत कोसळून दुर्दैवी अंत झाल्याच्या दुर्घटनेतून आला आहे. त्यामुळे या गावाचे पुनर्वसन शक्य तेवढ्या लवकर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दखल घेवून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, तहसीलदार व वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सर्व्हेक्षण करावे, असे निर्देश केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
खासदार हंसराज अहीर यांनी २२ फेब्रुवारी रोजी चारगाव गावाला येथे भेट देवून धोकादायक स्थितीत असलेल्या घरांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत वेकोलि माजरी क्षेत्राचे महाप्रबंधक आभा सिंह, भद्रावतीचे नायब तहसीलदार गोंड व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या भेटीदरम्यान त्यांनी चारगाव या गावाचे तातडीने पुनर्वसन करण्याकरिता जिल्हा प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, तहसिलदारांनी परिस्थितीची पाहणी करून तसा अहवाद प्रशासनाकडे तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले.
यावेळी त्यांनी भिंत कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या सुवर्णा धानकी या शाळकरी मुलीच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता आपण प्रयत्न करू असे, आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी चारगाव येथील अनेक नागरिकांनी आपल्या व्यथा मंत्री महोदयांकडे मांडल्या. यावेळी जि.प. सदस्य विजय वानखेडे, रवि नागपुरे, नरेंद्र जीवतोडे, प्रविण सातपुते, वसंत सातभाई, सुर्यकांत गौरकार, बबलु सय्यद व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)