मोठे होण्यासाठी खूप वाचन करा
By Admin | Updated: December 21, 2015 01:11 IST2015-12-21T01:11:00+5:302015-12-21T01:11:00+5:30
टिव्ही, पडदा वा नाटक यामध्ये कलावंत ज्या भूमिका करतात, प्रत्यक्ष जीवनातही ते तसेच असावेत आणि तसे असायलाच हवे, ....

मोठे होण्यासाठी खूप वाचन करा
सखी मंचतर्फे ‘ग्रेट भेट’ : प्रशांत दामले व तेजश्री प्रधानचा सखींना सल्ला
चंद्रपूर : टिव्ही, पडदा वा नाटक यामध्ये कलावंत ज्या भूमिका करतात, प्रत्यक्ष जीवनातही ते तसेच असावेत आणि तसे असायलाच हवे, असे साधारणत: मानले जाते, मात्र, बहुधा तसं राहात नाही आणि तशी अपेक्षा करणे चूक आहे. प्रत्येक कलावंताचे आपले स्वतंत्र जीवन आणि विचार असतात. पात्रांचे स्वभाव लेखक ठरवितात आणि ते काल्पनिक असतात. त्यामुळे, पात्रात कलावंतांच्या खासगी जीवनाचा मेळ बसलाच पाहिजे असे होत नाही, अशी स्पष्ट करीत मोठे होण्यासाठी खूप आणि निरंतर वाचन केले पाहिजे, अस सल्ला सिनेअभिनेता प्रशांत दामले आणि ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान हिने चंद्रपूर येथे लोकमत सखी मंचच्या सदस्यांना दिला.
लोकमत सखी मंचच्या वतीने शनिवारी प्रियदर्शिनी सभागृहात ‘ग्रेट भेट’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रशांत दामले आणि तेजश्री प्रधान यांनी सखींशी मनमोकळी चर्चा केली.
प्रश्नोत्तराच्या या प्रवासात, तेजश्री प्रधान हिने अभिनय क्षेत्रात प्रवेश कसा झाला याबाबत सांगितले, ती म्हणाली, प्रारंभी दोन चित्रपट मिळाले. त्यानंतर ‘होणार सून..’ ही मालिका! या मालिकेने खूप नाव दिले. प्रेक्षकाचे प्रेम मिळाले. आता नाटकाकडे वळले आहे. चित्रपट, मालिका आणि नाटक यामधून नाटकात काम करताना कलावंतांच्या प्रतिमेचा कस लागतो. यात प्रेक्षकांपुढे थेट यावे लागते.अभिनय क्षेत्रात नव्याने पाय ठेवणाऱ्याने आरशापुढे उभे न राहता वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचावित त्यातून अभिनय शिकता येते.
अभिनेता प्रशांत दामले यांनीही उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ‘आम्ही सारे खवैय्ये’ या त्यांच्या लोकप्रिय कार्यक्रमावरच अधिक प्रश्न होते. किचन हा माझा आवडीचा विषय असला तरी घरातील किचनमध्ये मला प्रवेश नाही, असे म्हणताच प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. मला गायन क्षेत्रात जायचे होते. परंतु अभिनय क्षेत्रात आलो आणि येथेच रमला, असेही तो म्हणाला. संचालन लोकमतचे सहाय्यक उपसंपादक संतोष कुंडकर व लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे यांनी केले. तत्पूर्वी, तेजश्री प्रधान व प्रशांत दामले यांनी स्वागत जिल्हा कार्यालय प्रमुख विनोद बुले, जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर, लोकमतचे ज्येष्ठ सदस्य डॉ.अशोक बोथरा, सरला बोथरा यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)