चंद्रपूरचे नाव ‘चांदागड’ करा
By Admin | Updated: October 30, 2016 00:46 IST2016-10-30T00:46:12+5:302016-10-30T00:46:12+5:30
मूलनिवासींनी इंग्रजांना दिलेल्या लढ्याचे स्मरण करण्यासाठी चंद्रपूरचे नाव ‘चांदागड’ करण्यात यावे,...

चंद्रपूरचे नाव ‘चांदागड’ करा
टी. एम. साव : गडचांदूर येथे शहीद दिवस
गडचांदूर : मूलनिवासींनी इंग्रजांना दिलेल्या लढ्याचे स्मरण करण्यासाठी चंद्रपूरचे नाव ‘चांदागड’ करण्यात यावे, अशी मागणी मूलनिवासी संघाचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य टी.एम. साव यांनी केली.
शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती व मूलनिवासी संघाच्या वतीने शहीद बाबुराव शेडमाके यांच्या १५८ व्या शहिददिनी अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी एम.टी. साव होते.
साव यांनी सांगितले की, १८२३ पासून आमच्या मूलनिवासींनी इंग्रजांशी स्वातंत्र्याकरिता केलेल्या संघर्षांना इतिहासातून पूर्णपणे गारद करण्यात आले आहे. बाबुराव शेडमाके यांनी इंग्रजापासून स्वातंत्र्यासाठी रेगडी, घोट, मूलपर्यंत सैन्य उभे केले. सेठसावकारांच्या पाशातून सर्व मूलनिवासींना मुक्त केले. घोट येथे वैशाख पोर्णिमेला पेरसापेन पूजा सुरू असताना इंग्रजाचा कॅप्टन शेक्सपियरने घेरले. त्यामुळे ते रात्री झोपेतच पकडल्या गेले. पण ते रस्त्यात रोहिल्यांच्या हाती तुरी देवून निसटले. त्यांनी वैनगंगा घाटावर इंग्रज अधिकाऱ्यासह सर्व सैनिकांना कापून टाकले. शेवटी राजमाता लक्ष्मीबाई, अहेरी यांच्या करवी जेवन करताना पकडल्या गेले. त्यांना २१ आॅक्टोबरला चांदागड म्हणजे चंद्रपूर येथे जेलमधील पिंपळाच्या झाडाला फाशी देण्यात आली. आमच्या मूलनिवासींचा इतिहासच चांदागडाशी निगडीत आहे. तो शौर्याचा इतिहास समोर राहण्यासाठी चंद्रपूरचे नाव चांदागड करण्यात यावे, असे साव यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन भद्रावती नगरपालिकेचे कर निर्धारक चरणदास शेडमाके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कविता मडावी, जिल्हा बँक माजी मानद सचिव जी.के. उपरे, जिल्हा बँक सचिव पांडुरंग जाधव आदींनी अभिवादन केले. संचालन शावलिन खोब्रागडे यांनी केले. प्रास्ताविक भीमराव पाटील व आभार अनिल शिडाम यांनी केले. याप्रसंगी गडचांदूर नगर परिषद उपाध्यक्ष सचिन भोयर, नगरसेवक चंद्रभागा कोरवते, शरद जागे, शरद बोरकर, मोतीराम करमनकर, दिगांबर झामरे, मूलनिवासी संघाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कायरकर, महेश टेकाम, कांबळे आदी अतिथी उपस्थित होते. (प्रतिनिधी)