जिल्हा विकासासाठी मेक इन चंद्रपूर
By Admin | Updated: January 27, 2015 23:30 IST2015-01-27T23:30:15+5:302015-01-27T23:30:15+5:30
मेक इन इंडियाच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मेक इन चंद्रपूरची घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रजासत्ताक दिनी केली.

जिल्हा विकासासाठी मेक इन चंद्रपूर
चंद्रपूर : मेक इन इंडियाच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मेक इन चंद्रपूरची घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रजासत्ताक दिनी केली.
पोलीस मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात ते बोलत होेते. यावेळी महापौर राखी कंचर्र्लावार, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, आमदार नाना श्यामकुळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, ताडोबा क्षेत्र संचालन पी.जी. गरड, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव व निवासी उपजिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे उपस्थित होते.
निरोगी व सुदृढ समाजासोबतच व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी राज्यमंत्री मंडळाने चंद्रपूर जिल्हा दारुबंदी घोषित केल्याचे सांगून व्यसनमुक्तीच्या प्रचार प्रसिद्धसाठी ४ कोटी रुपयाची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनमुक्त समाजासाठी जिल्हावासीयांच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सर्वसामान्याच्या हिताला डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जाणार असून राज्यात पुढील वर्षात ५ गावांचा दुष्काळ मुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. आगामी पाच वर्षात २ लाख ५० हजार शेततळी व ५० हजार सिमेंट नाला बांध बांधून सिंचन क्षमता वाढविण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. अपुऱ्या पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील १३५१ गावामधील ३ लाख ५ हजार ४०९ शेतकऱ्यांना २०४ कोटीची मदत सरकारने जाहीर केल्याचे सांगून ८५ कोटीची मदत प्राप्त झाली आहे.
वनप्रशिक्षण संस्थेचा दर्जा वाढवून वनअकादमी निर्माण करण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात जाहीर केला. वनअकादमीसाठी १०० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. (नगर प्रतिनिधी)