Major use of Major Minerals in road construction of Rs 250 cr. | २५० कोटींच्या रस्ता बांधकामात मेजर मिनरलचा सर्रास वापर

२५० कोटींच्या रस्ता बांधकामात मेजर मिनरलचा सर्रास वापर

ठळक मुद्देदुर्लक्ष : पडोली ते राजुरा व पौनी ते कोरपना मार्गाचे बांधकाम निकृष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पडोली-दाताळा-देवाडा-हडस्ती ते राजुरा तसेच पौनी-कवठाळा-नारंडा-वनोजा ते कोरपना या दोन्ही मार्गासाठी सुमारे २५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराने या रस्ता बांधकामात मायनर मिनरलऐवजी मेजर मिनरलचा वापर सुरू केला आहे. मायनर मिनरलपेक्षा मेजर मिनरलसाठी पटीने महसूल शासनाकडे जमा करावा लागतो. कंत्राटदाराच्या या क्लृप्तीमुळे शासनाचा मेजर मिनरलचा महसूल बुडणार आहे. शिवाय हा मार्ग निकृष्ठ दजार्चा होईल. यामुळे तो लवकरच खराब होणार असल्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहेत.
कोणत्याही रस्ता बांधकामात कधीही मेजर मिनरलचा वापर केला जात नाही. रस्ता बांधकामाकरिता या मेजर मिनरलचा वापर करण्याची परवानगीसुद्धा दिली जात नाही. चंद्रपूर जिल्ह्यात आजवर झालेल्या रस्ता बांधकामात मेजर मिनरलचा कुठेही वापर करण्यासाठी संबंधित विभागाने परवानगी दिली गेली नसल्याचे समजते. असे असताना पडोली-दाताळा-देवाडा-हडस्ती ते राजुरा तसेच पौनी-कवठाळा-नारंडा-वनोजा ते कोरपना या दोन्ही मार्गाच्या बांधकामात कंत्राटदार मायनरच्या नावावर मेजर मिनरलचा वापर कसा काय करीत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पडोली- दाताळा- देवाडा- हडस्ती ते राजुरा व पौनी-कवठाळा- नारंडा-वनोजा ते कोरपना या दोन्ही मागार्साठी शासनाने सुमारे २५० कोटींचे कंत्राट एम. बी. पाटील कंस्ट्रक्शन कंपनीला दिलेले आहेत. या कंपनीने वनोजा येथे स्वत:चे क्रशर लावले आहे. हे क्षेत्र सिमेंट कंपन्यांसाठीच निर्धारित आहे हे विशेष.
सिमेंट निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या दगडाचा वापर रस्ता बांधकामात होत आहे. वापरण्यात येत असलेला दगड मेजर मिनरलमध्ये मोडतो. वास्तविक, रस्ता बांधकामात मायनर मिनरलचा वापर केला जातो. मेजर मिनरलसाठी मायनर मिनरलपेक्षा शासनाकडे अधिक महसूल जमा करावा लागतो. मात्र संबंधित कंत्राटदार मेजर मिनरलला मायनर मिनरल असल्याचे दाखवून शासनाचा महसूलही बुडवत असल्याची माहिती अधिकारी सूत्राने दिली.

रस्ता अल्पावधिचा ठरणार
रस्ता बांधकामात टणक दगडाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे रस्ता बराच काळपर्यंत टिकून राहतो. मात्र पडोली-दाताळा-देवाडा-हडस्ती ते राजुरा व पौनी-कवठाळा-नारंडा-वनोजा ते कोरपना या दोन्ही मागार्साठी वापरात येत असलेला दगड हा चुनखडी स्वरूपाचा असून तो ठिसूळ व चपटा आहे. तो वाहनांच्या वर्दळीमुळे फुटून रस्ता अल्पावधितच खराब होईल, असे काही अधिकारी वर्गांचे म्हणणे आहे. भविष्यात पुन्हा या रस्त्यासाठी शासनाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागणार आहे. तेव्हा वेळीच याकडे लक्ष देऊन होत असलेले निकृष्ठ दर्जाचे बांधकाम ताबडतोब थांबवून हे रस्ते मजबूत होईल, यासाठी संबंधित विभागाने वेळीच लक्ष देण्याची मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.

Web Title: Major use of Major Minerals in road construction of Rs 250 cr.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.