इरई नदी पुनरूज्जीवन कार्यक्रमास महाऔष्णिक केंद्र देणार योगदान
By Admin | Updated: May 5, 2016 01:28 IST2016-05-05T01:28:15+5:302016-05-05T01:28:15+5:30
चंद्रपूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या पुनरूज्जीवनाच्या कार्यक्रमात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र आपले योगदान देणार आहे.

इरई नदी पुनरूज्जीवन कार्यक्रमास महाऔष्णिक केंद्र देणार योगदान
पालकमंत्र्यांसोबत बैठक : तातडीने दोन जेसीबी मशीन व पाच टिप्पर कायमस्वरूपी उपलब्ध होणार
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या पुनरूज्जीवनाच्या कार्यक्रमात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र आपले योगदान देणार आहे. महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विपीन श्रीमाळी यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे या कामासाठी तातडीने दोन जेसीबी मशीन व पाच टिप्पर कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहेत.
मंगळवारी सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे झालेल्या बैठकीत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इरई नदीच्या पुनरूज्जीवन कार्यक्रमात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने सहभाग व योगदान द्यावे, अशी सूचना केली. इरई नदीच्या पुनरुज्जीवन करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रामुळे गेल्या काही वर्षात इरई नदीची क्षती झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने पुनरुज्जीवन कामात योगदान व सहभाग देणे गरजेचे आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यांच्या मताला महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विपीन श्रीमाळी यांनी होकार दिला व या कामासाठी तातडीने दोन जेसीबी मशीन व पाच टिप्पर कायमस्वरूपी उपलब्ध करून देऊन महानिर्मिती कंपनीच्या आर्थिक योगदानाचे स्वरुपसुद्धा लवकरच ठरविण्यात येईल, असे विपीन श्रीमाळी यांनी स्पष्ठ केले.
बैठकीला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विपीन श्रीमाळी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)