लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निवडणूक म्हणजे पदयात्रा, भेटीगाठी, पत्रके वाटणे, सभांद्वारे गर्दी आणि शक्तीप्रदर्शन. हा निवडणुकीचा वर्षानुवर्षाचा पारंपरिक पॅटर्न. पण आता काळानुरूप प्रचाराचा ट्रेंड बदलला आहे. त्यामध्ये आधुनिकता, अचुकता आली आहे.उद्योग, व्यवसाय, वयोमान, वर्गवारीनुसार प्रचाराचे सोशल इंजिनिअरिंग सुरू झाले आहे. त्यादृष्टीने त्या-त्या वर्गातील नेतृत्व, प्रसंगी अन्य राज्यांतून नेते येऊन भेटीगाठींची व्यूहरचना सुरू आहे. एवढेच नव्हे तर प्रचार ते मतदानासाठी ईव्हीएम मशीन, गतीमान मतमोजणी अशी सर्व यंत्रणा आता ऑनलाईनवर आली आहे.उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचार आणि मतांसाठी व्यूहरचना आलीच. यासाठी राज्य, राष्ट्रीय नेत्यांच्या सभा, प्रचार पदयात्रा, रोड शो, बैठका होत असत. त्या सर्वच निवडणुकांमध्ये विकासकामे, स्थानिक प्रश्न, त्याची सोडवणूक आणि त्यातून आरोप-प्रत्यारोप, टीका या माध्यमातून प्रचार केला जात असे. चौक, मंडळे, संध्याकाळच्या कॉर्नर सभा, भागा-भागातील ज्येष्ठ मंडळींमार्फत भेटीगाठींद्वारे व्यूहरचना आखली जात असे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बूथयंत्रणा, त्या माध्यमातून प्रचार आणि सोबतच मतदारांना मतपत्रिका पोहोचविणे, मतदान पार पाडण्याची प्रक्रिया यासाठी प्रयत्न केले जात असत. पण आता गतीमान युगात सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहे. त्याच पद्धतीने निवडणुकीचा ट्रेंडही बदलत चालला आहे. मतदार याद्या ऑनलाईन होत गेल्या. तसतसा प्रचारही ऑनलाईनवर गेला. सर्वच पक्षांच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांनीही स्वत:मध्ये तसा बदल केला आहे. मतदान मतपत्रिकेवरून इलेक्ट्रॉनिक मशीनवर (ईव्हीएमवर) आले. तसेच सर्वच पक्षांनी निवडणूक हे ‘मिशन’ ठेवून व्यूहरचना केली आहे. बूथ, प्रचार, समन्वय त्यादृष्टीने आराखडा तयार केला जात आहे. यासाठी वेगवेगळे सेल, आघाड्या आणि त्या-त्या क्षेत्राची त्यांनी जबाबदारी पार पाडायची, असे चोख नियोजन केल्याचे दिसून येते. यामध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी, उद्योग-व्यवसाय, शेती, वैद्यकीय सेवा-सुविधा, महिलांसाठी सुविधा अशा वेगवेगळ्या मदतीच्या योजना, शासनाने केलेल्या कामांचा लेखाजोखा मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम एका बाजूने सुरू आहे. त्याचवेळी विरोधकांकडून न झालेल्या कामांबद्दल आणि जनतेतील नाराजीचा रोष ‘इनकॅश’ करण्यासाठी प्रचाराची सूक्ष्म यंत्रणा राबविली जात आहे. प्रचाराचे साहित्य आणि त्याची पद्धतही त्याच पद्धतीने ऑनलाईन झाल्याचे अलिकडच्या निवडणुकीत दिसून येत आहे. अर्थात यामध्ये स्थानिक पातळीवरील विकास आणि त्यादृष्टीने यश-अपयशाचेही मोजमाप प्रचारात वापरले जात आहे. त्यासाठी निवडणूक वचननामा, जाहीरनामाही त्याच पद्धतीने तयार होत आहे.एवढेच नव्हे तर प्रचाराचा आलेख वाढविणे, त्यादृष्टीने किती फायदा, तोटा याचाही लेखाजोखा जनतेतून घेतला जात आहे. यासाठीही यंत्रणा राबविली जात आहे. केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण पातळीवरही असा प्रचाराचा ट्रेंड दिसून येत आहे. साहजिकच या पद्धतीने प्रचारातील बदल सर्वच वयोगटातील उमेदवारांनीही आत्मसात केल्याचे दिसून येते. एकूणच या ‘मिशन इलेक्शन’चे मायक्रोप्लॅनिंग आणि त्याची अंमलबजावणी यामुळे निवडणुकांनाही आता कापोर्रेट लूक येऊ लागला आहे.सभा आणि गर्दीचे महत्त्व मात्र कायमनिवडणुकांचा ट्रेंड कितीही बदलला तरी प्रचारसभा आणि गर्दी खेचणारे स्टार प्रचारक यांचे आकर्षण काही कमी झालेले नाही. अशा सभांशिवाय निवडणूक होऊच शकत नाही. त्यासाठी सर्वच पक्षांकडून अशा नेत्यांच्या वेळा आणि त्यानुसार प्रचारासाठी व्यूहरचना सुरू असते. अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याचाच प्रत्यत आला आहे. दरम्यान, सोमवारी उमेदवारांच्या माघारीनंतर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांमध्ये लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता लवकरच राजकीय पक्षांकडून विविध सभांचे नियोजन जाहीर होणार आहे.
Maharashtra Election 2019 : पारंपरिक प्रचाराचा आता ट्रेंड बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:05 IST
उद्योग, व्यवसाय, वयोमान, वर्गवारीनुसार प्रचाराचे सोशल इंजिनिअरिंग सुरू झाले आहे. त्यादृष्टीने त्या-त्या वर्गातील नेतृत्व, प्रसंगी अन्य राज्यांतून नेते येऊन भेटीगाठींची व्यूहरचना सुरू आहे. एवढेच नव्हे तर प्रचार ते मतदानासाठी ईव्हीएम मशीन, गतीमान मतमोजणी अशी सर्व यंत्रणा आता ऑनलाईनवर आली आहे.
Maharashtra Election 2019 : पारंपरिक प्रचाराचा आता ट्रेंड बदलला
ठळक मुद्देहायटेक व गतिमान प्रचार : कमी वेळात अधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न