Maharashtra Election 2019 ; मुस्लीम समाजाच्या पाठीशी भाऊ म्हणून राहील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:34+5:30
मुस्लीम समाजातील भगिणींसाठी बचतगटांची निर्मिती करून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी चळवळ आपण उभी केली आहे. सर्व भगिनींसाठी या विभागाचा आमदार म्हणून नाही तर त्यांचा भाऊ म्हणून सर्वशक्तीनिशी पाठीशी राहील, अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Maharashtra Election 2019 ; मुस्लीम समाजाच्या पाठीशी भाऊ म्हणून राहील
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : या मतदार संघाचा विकास करताना, जिल्ह्याचा विकास करताना, राज्याचा विकास करताना मी कधीही जात, धर्म असा भेद बाळगला नाही. धर्म कोणताही असो, जात कोणतीही असो प्रत्येकाच्या रक्ताचा रंग हा लालच असतो. मुस्लीम समाजातील भगिणींसाठी बचतगटांची निर्मिती करून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी चळवळ आपण उभी केली आहे. सर्व भगिनींसाठी या विभागाचा आमदार म्हणून नाही तर त्यांचा भाऊ म्हणून सर्वशक्तीनिशी पाठीशी राहील, अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
बल्लारपूर शहरातील संत तुकाराम महाराज सभागृहात हाजी बांधवांचा सत्कार तसेच अल्पसंख्यांक पदाधिकाऱ्यांच्या संमेलनात सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
यावेळी मंचावर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हाजी हैदर आजम, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, परवीन मोमीन, शेख जुम्मन, उस्मानभाई, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, सज्जाद अली यांच्या मुस्लीम समाजाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थिते होते. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, नागपुरातील ताजुद्दीन बाबांच्या दरगाहसाठी आपण निधी उपलब्ध केला आहे. अल्पसंख्यांक समाजासाठी औरंगाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ आपण निर्माण करीत आहोत. बल्लारपूर शहरात नाटयगृह, पोलीस स्टेशन, उपविभागीय अधिकारी कार्यालय, सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन, स्टेडियम आदी विकासकामांसह कब्रस्तानसाठीसुध्दा आपण निधी उपलब्ध केला आहे. मुस्लीम समाजबांधवांची शादीखाना बांधण्याची मागणी आहे. ती मागणी आपण प्राधान्याने पूर्ण करू, अशी ग्वाही यावेळी मुनगंटीवार यांनी दिली.
बहुमताचा कौल द्यावा- हाजी हैदर आजम
शैक्षणिक कर्ज असो वा अन्य योजनांसाठी जेव्हा आम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी केली, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी निधी मंजूर केला. त्यांनी नेहमीच मुस्लीम बांधवांच्या हिताची भूमिका घेतली आहे. मुस्लीम समाजबांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांना प्रचंड बहुमताचा कौल बहाल करावा, असे आवाहन मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हाजी हैदर आजम यांनी यावेळी केले.