महाराष्ट्र- तेलंगणला जोडणारा पूल धोकादायक
By Admin | Updated: August 11, 2016 00:36 IST2016-08-11T00:36:45+5:302016-08-11T00:36:45+5:30
महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वर्धा नदीवरील पोडसा गावालगत मोठा पूल बांधण्यात आला आहे.

महाराष्ट्र- तेलंगणला जोडणारा पूल धोकादायक
तोहोगाव : महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वर्धा नदीवरील पोडसा गावालगत मोठा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने या पुलावरुन होणारी वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर आली आहे. हा पूल मध्येच वाकला असल्याने कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या चार वर्षापूर्वीच या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पुलाचा एक पीलर पूर्णत: खाली दबल्याने पुल कोसळण्याची भीती असून कोणत्याही वेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागालादेखील याची भीत असल्याने त्यांनी या संदर्भात वरिष्ठांकडे तसा प्रस्ताव पाठविल्याची माहिती आहे. तरीही सध्या या पुलावरून वाहतूक अविरत सुरूच आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळ झालेल्या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरील पुलांचा आढावा घेतला असता, ही गंभीर बाब पुढे आली. चंद्रपूर जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हामार्ग अशा तीनही प्रकारच्या मार्गावर ५५१ मोठे पुल व ३१८७ लहान पुल आहेत. यातील बहुतांशी पुलाचे बांधकाम १९९५ नंतर करण्यात आल्याने सर्व पूल सुरक्षित व वाहतुकीस योग्य आहेत. काही ठिकाणी जुन्या पुलांऐवजी नवीन पूल बांधण्यात आले. या पुलांची वयोमर्यादा २५ ते ४० वर्षाची असल्याने कोणताही धोका नाही. परंतु, गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा गावालगतचा वर्धा नदीवरील हा पुल दबल्याने या महामार्गावरील वाहतुकीस धोका निर्माण झालेला आहे. ही नदी बारामाही वाहत असल्याने पाण्याचा प्रवाह मोठा असतो. सध्या पावसाळा सुरु असल्याने ही नदी दुधडी भरुन वाहत आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुघर्टना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ कडे आली. त्यानंतर या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी स्वत: या पुलाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करुन दुरुस्तीसंदर्भात वरिष्ठांकडे अहवाल सादर केला आहे.
चार वर्षापूर्वी बांधकाम झालेल्या पोडसाजवळील या पुलाचा एक पिल्लर दबला आहे. त्यामुळे कन्सलटंट नेमून दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच हे काम सुरु होईल. सध्या हलकी वाहतूक या पुलावरुन सुरु असून तीसुद्धा बंद केली जाणार आहे.
- एम.एम. जैस्वाल, कार्यकारी अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग, क्र.२ चंद्रपूर