महानुभाव साहित्य म्हणजे समाजहिताचाच विचार

By Admin | Updated: December 13, 2014 22:35 IST2014-12-13T22:35:41+5:302014-12-13T22:35:41+5:30

महानुभाव साहित्यच मराठी साहित्याची गंगोत्री आहे. याबाबत वाद करण्यात काहीच अर्थ नाही. मुस्लिमांच्या आक्रमणानंतर या प्राचिन साहित्याला धोका निर्माण झाला. त्यामुळे हे साहित्य टिकावे

Mahanubhipa Sahitya is the idea of ​​social interest | महानुभाव साहित्य म्हणजे समाजहिताचाच विचार

महानुभाव साहित्य म्हणजे समाजहिताचाच विचार

६४ वे विदर्भ साहित्य संमेलन : महानुभाव साहित्य हीच खरी मराठी साहित्याची गंगोत्री
राजेश पाणूरकर - चक्रधर स्वामी साहित्य नगरीतून
महानुभाव साहित्यच मराठी साहित्याची गंगोत्री आहे. याबाबत वाद करण्यात काहीच अर्थ नाही. मुस्लिमांच्या आक्रमणानंतर या प्राचिन साहित्याला धोका निर्माण झाला. त्यामुळे हे साहित्य टिकावे म्हणून महानुभावी साहित्यिकांनी सांकेतिक भाषेत हे साहित्य निर्माण केले. सांकेतिक भाषा नंतरच्या काळात उपयोगात आणल्याने महानुभाव साहित्याच्या काळाबाबत वाद होत असले तरी हे साहित्यच मराठी साहित्याची गंगोत्री असल्याचा सूर शनिवारच्या परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
विदर्भ साहित्य संघ, तळोधी आणि श्री गोविंदप्रभू कला व वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने आयोजित ६४ व्या विदर्भ साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवशी ‘महानुभाव साहित्य हीच खरी मराठी साहित्याची गंगोत्री’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी महंत न्यायंबासबाबा शास्त्री तर वक्ते म्हणून डॉ. सतीश तराळ, डॉ. श्याम मोहोरकर, डॉ. वसुधा वैद्य उपस्थित होते. महंत न्यायंबासबाबा शास्त्री अध्यक्षस्थानावरुन बोलताना म्हणाले, महानुभाव साहित्याची प्रेरणा फसविल्या गेलेल्या समाजाला विधायकतेकडे नेणारी आहे. समाजाच्या हितासाठी असते ते खरे साहित्य. महानुभाव साहित्य किती प्राचीन आहे, हा वादाचा मुद्दा असू शकतो पण महानुभाव साहित्यात किती मूलगामी लेखन आहे, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. समाजाला विकारशून्य करण्याचा प्रयत्न महानुभाव साहित्याने केले. गुन्हे घडतात, बलात्कार होतात आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडत आहेत कारण त्यांच्यापर्यंत साहित्य पोहोचत नाही. नऊ रसांपैकी सर्व रस साहित्यात असतात पण शांत रस माणसाला जीवनाचा हेतू सांगणारा आहे. स्वामींचा काळ आपण गृहित धरला तर शके ११४३ हा त्यांचा अवतारकाळ मानला जातो. त्यामुळे मराठीचा आद्यग्रंथ लीळाचरित्रच आहे. यासंदर्भात कोलतेंचे संशोधन आहे. हा काळ अधिक मागे नेता येतो पण या वादात न पडणेच योग्य आहे, असे ते म्हणाले. स्वामींनी त्या काळात जी वैचारिक आणि सामाजिक क्रांती केली, त्याला तोड नाही. अन्यथा आपली संस्कृतीच टिकली नसती. स्वामींनी पाया भरला म्हणून त्यानंतर अनेक चळवळी होऊ शकल्यात, हे त्याचे महत्व आहे. हे साहित्य निर्माण झाले नसते तर आज आपण मस्जिदीत राहिलो असतो, असे महंतांनी स्पष्ट केले.
विवेकसिंधु नव्हे लिळाचरित्रच प्राचीन
श्याम मोहोरकर म्हणाले, महानुभाव साहित्याचा प्रारंभ ११ व्या शतकातच झाला, याचे अनेक पुरावे आहेत. पण मुकुंदराज यांचा विवेकसिंधु हा आद्यग्रंथ असल्याचे बोलले जाते. पण मुकुंदराजांनी मराठीचा दुबळा विचार मांडला. त्यांच्या जन्माबाबतही संशोधकांमध्ये एकमत नाही. अज्ञान आणि अडाणी लोकांची भाषा मराठी आहे, असे मत त्यांनी मांडले आहे.
ज्ञानदेवांनी मराठीबाबत जे ‘अमृताहुनी पैजा जिंके’ म्हटले त्याला उत्तर देताना मुकुंदराजांनी दिलेले उत्तर वाईट आहे. भाषेत रसाळपणा आणून तिला अलंकृत करुन भाषा नागविली जाते, असे त्यांचे मत होते. ते मराठीचे आद्यकवी कसे होतील. त्यामुळेच मराठी साहित्याची गंगोत्री महानुभाव साहित्यच आहे, असे मोहोरकर म्हणाले.
डॉ. वसुधा वैद्य म्हणाल्या, महानुभाव साहित्याचा अभ्यास अजूनही पूर्ण झालेला नाही. या साहित्याचा शोधच अद्याप लागलेला नाही. बरेच साहित्य अप्रकाशित असून तत्पुर्वीच कुठल्या निष्कर्षावर पोहोचणे चुकीचे ठरेल. महानुभाव साहित्याशिवाय मराठीचा विचारही करता येत नाही कारण महानुभाव साहित्य हाच साहित्याचा मुख्य प्रवाह आहे, असे त्या म्हणाल्या.
सांकेतिक लिपीमुळे प्रसार कमी
डॉ. सतीश तराळ म्हणाले, महानुभाव साहित्य अमरावती आणि चांदुरबाजारच्या बोलीभाषेत लिहिले गेले आहे. सांकेतिक लिपित ते असल्याने आपल्यापर्यंत पोहचले नाही. त्याचा आता अभ्यास सुरु आहे आणि महानुभाव साहित्य प्राचीन असल्याचे पुरावे आहेत. ज्ञानेश्वरी हा आपण आद्यग्रंथ मानला तर लिळाचरित्र त्याच्या १२ वर्षे आधी लिहिलेला आहे. केवळ ७ ग्रंथापुरते हे साहित्य मर्यादित नाही. त्यामुळे मराठी साहित्याची गंगोत्री महानुभाव साहित्यच असल्याचे मत त्यांनी मांडले. या परिसंवादाचे संचालन डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले.

Web Title: Mahanubhipa Sahitya is the idea of ​​social interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.