महाबीजच्या बियाणांचे परमिट शेतकऱ्यांना घरपोहोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST2021-06-09T04:36:20+5:302021-06-09T04:36:20+5:30
मासळ (बु) : दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तालुका कार्यालयाला ...

महाबीजच्या बियाणांचे परमिट शेतकऱ्यांना घरपोहोच
मासळ (बु) : दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तालुका कार्यालयाला जाणे शक्य नव्हते. कोरोना आजाराचा संभाव्य धोका लक्षात घेता चिमूर तालुका कृषी कार्यालयाने कृषी सहायक यांच्या मार्फत मासळ परिसरातील शेतकऱ्यांना महाबीज बियाणांचे परमिट वितरण घरपोहोच केले आहे.
कृषी विभागातर्फे महाडीबीटी पोर्टलवर संगणकप्रणाली विकसित केली आहे. सर्व योजनांचा एकत्रित लाभ मिळावा यासाठी पोर्टलमार्फत शेतकऱ्यांनी भात, तूर, सोयाबीन, कापूस या अनुदानित बियाणांसाठी ऑनलाइन अर्ज केले. त्यात परिसरातील अनेक शेतकऱ्यांना अनुदानित बियाणांची लॉटरी लागली आहे. सोमवारपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली असून, खरीप पिकांची पेरणी व लागवडीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभागाने बचतगटामार्फत खत पोहोचविणे सुरू केले असले तरी कृषी दुकानांमध्ये बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत भात, तूर, कापूस, सोयाबीन पिकांचे बियाणे अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतकऱ्यांना प्रथमच राज्यस्तरावरून ऑनलाइन सोडत पद्धतीने सवलतीच्या दरात बियाणे मिळणार आहे. तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तिखे यांच्या मार्गदर्शनात कृषी सहायक बळीराम येवले व कृषी पर्यवेक्षक गौतम टेंभुर्णे यांच्या मार्फत मासळ परिसरातील शेतकऱ्यांना महाबीज बियाणांचे परमिट घरपोच दिले जात असल्याने परिसरातील शेतकऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे.
मागील वर्षात तालुक्यातील काही भागात बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना ऐन शेती हंगामात नुकसान झाले. या वर्षात तालुका कृषी विभाग कार्यालय चिमूरच्या वतीने मासळ परिसरात भाताची बीजप्रक्रिया, सोयाबीन उगवणक्षमता अशा विविध योजना राबविण्यात आल्या. अनुदानावर बियाणांच्या लॉटरीत नंबर लागला आहे. कृषी सहायकांमार्फत घरपोहोच बियाणांचे परमिट मिळाले.
कैलास गणवीर, शेतकरी, मासळ( बु.)
===Photopath===
080621\img_20210606_114841.jpg
===Caption===
शेतकऱ्यांना घरपोच परमीट देतांना कृषी विभागाचे कर्मचारी व उपस्थित शेतकरी