महाबीज कंपनीला भरपाईचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 00:34 IST2017-03-20T00:34:26+5:302017-03-20T00:34:26+5:30
जुलै महिन्यात महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाणाची लागवड करण्यात आली. त्यामध्ये सदर सोयाबीन बियाणे उगविलेच नाही.

महाबीज कंपनीला भरपाईचा विसर
शेतकरी प्रतीक्षेत : सोयाबीन उगविलेच नाही
प्रविण खिरटकर वरोरा
जुलै महिन्यात महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाणाची लागवड करण्यात आली. त्यामध्ये सदर सोयाबीन बियाणे उगविलेच नाही. अशा ४५२ तक्रारी कृषी विभागास प्राप्त झाल्याने कृषी विभागाने तातडीने पाहणी करून अहवाल महाबीज कंपनीकडे पाठविला. पण मागील नऊ महिन्यांपासून महाबीज कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
वरोरा तालुक्यातील भेडाळा, पिपळगाव, वडधा, दिंदोडा, जामगाव, धानोली, चारगाव, साखर, बोरगाव, परसोडा आदी गावातील शेतकऱ्यांनी ३३० हेक्टरमध्ये महाबीज कंपनीच्या जे.एस. ९५६० या सोयाबीन वाणाची लागवड जून महिन्याच्या शेवट व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली. यामध्ये काही शेतकऱ्यांना प्रकल्प वाटपातून तर उर्वरीत शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून जे.एस. ९५६० या महाबीज कंपनीच्या सोयाबीन वाणाची खरेदी केली होती. यातील सोयाबीन बियाणे उगवले नाही.
त्यामुळे परिसरातील ४५२ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे जुलै महिन्यात तक्रारी केल्या. यामुळे कृषी विभागाने कृषी विद्यापिठ प्रतिनिधी व महाबीज कंपनीच्या प्रतिनिधीसोबत शेताची पाहाणी करून तातडीने अहवाल शासन व महाबीज कंपनीकडे दिला. त्यानंतर कंपनीने कुठलीही मदत शेतकऱ्यांना केली नाही. याशि२२२२२वाय खरीप पिकाचा हंगामही संपला आहे.
महाबीजमुळे ३३० हेक्टर शेतजमीन हंगामात पडित राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. असे असताना महाबीज कंपनीने आज नऊ महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना कुठलीही मदत दिली नाही. त्यामुळे महाबीज कंपनीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सुधारित पंचनामे केले असून बाधीत शेतकऱ्यांची यादी बँक खाते क्रमांकासह व आवश्यक दस्तऐवजासह कृषी विभागाने महाबीज कंपनीकडे दिली आहे.
- व्ही.आर. प्रकाश,
तालुका कृषी अधिकारी, वरोरा.