मदरशातील बालिकेचा विनयभंग
By Admin | Updated: November 8, 2014 22:34 IST2014-11-08T22:34:58+5:302014-11-08T22:34:58+5:30
स्थानिक जमनजेट्टी परिसरातील मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका १४ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली मदरसा कमिटीचा अध्यक्ष तथा काँग्रेस कार्यकर्ता फारूख सिद्धीकी याला शुक्रवारी रात्री

मदरशातील बालिकेचा विनयभंग
चंद्रपूर : स्थानिक जमनजेट्टी परिसरातील मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका १४ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली मदरसा कमिटीचा अध्यक्ष तथा काँग्रेस कार्यकर्ता फारूख सिद्धीकी याला शुक्रवारी रात्री शहर पोलिसांनी अटक केली. ही घटना उजेडात आल्यानंतर आरोपीला आमच्या हवाली करा, अशी मागणी तेथे उपस्थित जमावाने केली. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. रात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता. या प्रकरणी पोलिसांनी फारूख सिद्धीकीविरुद्ध भादंवि ३५४ (अ), बालकांचे लैंगिक संरक्षण अधिनियम ७/८, ९/१० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, शनिवारी आरोपी फारूख सिद्धीकीला न्यायालयापुढे उभे केले असता, त्याला १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आरोपी फारूख हा मदरसा कमिटीचा अध्यक्ष असून त्याने केलेल्या या कृत्याचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे.
तक्रारीनुसार, तीन दिवसांपूर्वी फारूखने मदरशात जाऊन तेथील एका मुलीला खोलीत बोलाविले व तेथे तिचा विनयभंग केला, असा आरोप आहे. काल मुलीचे नातलग भेटण्यासाठी आल्यानंतर तिने त्यांना आपबिती सांगितली. घडलेल्या प्रकाराने संतप्त झालेल्या नातलगांनी ही घटना मदरसा कमिटीच्या सदस्यांच्या कानावर घातली. सदस्यांनी याबाबत फारूखला जाब विचारला असता, त्याने आरोप नाकारण्याचा प्रयत्न केला. ही घटना वाऱ्यासारखी शहरात पसरताच, काल रात्री ८.३० वाजता शेकडो नागरिक मदरसा परिसरात दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी फारूख सिद्धीकीला अटक केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी ‘आरोपीला आमच्या ताब्यात द्या’ अशी मागणी केल्याने तणावात चांगलीच भर पडली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत केले. (प्रतिनिधी)