चंद्रपुरात सर्वात कमी ५२ टक्के मतदान
By Admin | Updated: February 18, 2017 00:33 IST2017-02-18T00:33:53+5:302017-02-18T00:33:53+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी गुरूवारी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ६९.४७ टक्के मतदान झाले आहे.

चंद्रपुरात सर्वात कमी ५२ टक्के मतदान
सरासरी ६९.४७ टक्के : जिल्हाभरात मतदार यादीत घोळ
चंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी गुरूवारी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ६९.४७ टक्के मतदान झाले आहे. उशिरा रात्री पोलिंग पार्ट्या पोहोचल्यानंतर शुक्रवारी प्रशासनाने मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर केली. त्यामध्ये चंद्रपूर तालुक्यात सर्वात कमी ५२.४९ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेकांना मतदान न करताच परत जावे लागले.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ५६ व १५ पंचायत समित्यांच्या ११२ जागांकरिता गुरूवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. ते सायंकाळ ५.३० वाजेपर्यंत सुरू होते. काही मतदार वेळेवर पोहोचल्याने त्यांचे मतदान करून घेण्यात आले. दुपारी १२.३० वाजतापर्यंत २३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा ओघ वाढला.
मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा लागल्या. परंतु चंद्रपूर तालुक्यात सायंकाळपर्यंतही टक्केवारीमध्ये फारशी सुधारणा झाली नाही. तेथे १२.३० वाजेपर्यंत १४.११ टक्के, २.३० वाजेपर्यंत २३.७१ टक्के आणि सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५२.४९ टक्के मतदान झाले.
मतदार यादीमध्ये घोळ असल्याने अनेक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. प्रशासनाने नवीन मतदार नोंदणी केल्यानंतर जानेवारी महिन्यात अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली. त्या यादीच्या आधारेच मतदान घेण्यात आले.
त्यानंतर मतदारापर्यंत चिठ्ठ्या पोहोचविण्यात न आल्याने मतदारांना आपला मतदार क्रमांक आणि मतदान केंद्र क्रमांक, याची माहिती मिळू शकली नाही. मतदानादरम्यान, बल्लारपूर तालुक्यात कवडजई येथील मतदान केंद्रावर सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख नजीर शेख यांच्यावर दोघांनी हल्ला चढविला. तर गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव येथील मतदान केंद्रावर इव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही वेळ मतदान खोळंबले होते. (प्रतिनिधी)
चंद्रपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघांचा परिसर बहुतांश नागरी वस्तीचा आहे. या भागातील उद्योगांमध्ये बाहेरगावचा मजूर वर्ग काम करतो. तो गावाकडे गेला की, मतदान करू शकत नाही. त्यामुळे चंद्रपूर तालुक्यात कमी मतदान झाल्याचे दिसून येते. प्रशासनाने मतदार जागृती मोहीम राबविली आहे. मतदानात वाढ व्हावी, याकरिता प्रशासनातर्फे यापुढेही प्रयत्न केले जातील.
- आशिष वानखेडे,
तहसीलदार, चंद्रपूर.
सर्वाधिक ब्रह्मपुरीत ७९.७२ टक्के
अंतिम मतदान संख्येनुसार, जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात सर्वाधिक ७९.७२ टक्के मतदान झाले आहे. सिंदेवाही तालुक्यात ७६.८१ टक्के, मूल ७५.८६ टक्के, पोंभुर्णा ७५.१९ टक्के, सावली ७४.०६ टक्के, चिमूर ७२.८९ टक्के, नागभीड ७२.६२ टक्के, जिवती ७२.३१ टक्के, गोंडपिपरी ७१.६९ टक्के, राजुरा ७०.४७ टक्के, कोरपना ६९.५३ टक्के, वरोरा ६७.५६ टक्के, बल्लारपूर ६४.१७ टक्के, भद्रावती ६२.८६ टक्के आणि चंद्रपूर तालुक्यात ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.