हरवलेले बालक अखेर पालकांच्या स्वाधीन
By Admin | Updated: March 22, 2015 00:05 IST2015-03-22T00:05:47+5:302015-03-22T00:05:47+5:30
सकाळच्यावेळी आई-वडिलांची नजर चुकवून भटकलेले एक तीन वर्षीय बालक येथील पत्रकार संजय वरघने यांना सापडले.

हरवलेले बालक अखेर पालकांच्या स्वाधीन
चिमूर : सकाळच्यावेळी आई-वडिलांची नजर चुकवून भटकलेले एक तीन वर्षीय बालक येथील पत्रकार संजय वरघने यांना सापडले. वरघने व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण शहर पिंजून काढून बालकाच्या आई-वडिलांचा शोध लावला. आणि त्यामुळे साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला. मनीष गोपाल धांडे असे त्या बालकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली.
चिमूर शहरात एक तीन वर्षांचा मुलगा सकाळी ८ वाजताच्या सुमारास घरासमोर खेळत असताना भटकत-भटकत स्थानिक मटण मार्केटमध्ये पोहचला. त्यामुळे तो गांगरून गेला. तो रडत असल्याचे पाहून तेथील एका महिलेने त्या मुलाला ग्रामपंचायत सदस्य सचिन पचारे, सामाजिक कार्यकर्ते किशोर पत्तीवार व लोकमतचे तालुका प्रतिनिधी संजय वरघणे यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यातही माहिती देण्यात आली. हरविलेल्या मुलाच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी वरघणे व सुरेश भोयर, महेश कामडी, गजानन गोहणे यांनी चिमुरातील वॉर्ड पिंजून काढले. आठ तासानंतर अखेर नेहरू वॉर्डात सदर मुलाचे आईवडिल असल्याची माहिती मिळाली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सदर बालक आईवडिलांसोबत चिमूर येथील मनोज सातपुते यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. खेळताना तो भरकटल्याने आईवडील शोधाशोध करीत होते. मुलगा मिळत नसल्याने ते हादरून गेले होते. अखेर बालक सुखरूप मिळाल्याने त्यांनी सर्वांचे आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)