शेतातील विहीर खचून लाखोंचे नुकसान
By Admin | Updated: October 5, 2014 23:01 IST2014-10-05T23:01:57+5:302014-10-05T23:01:57+5:30
येथून आठ किमी अंतरावर असलेल्या आक्सापूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतशिवारातील विहीर पाण्याच्या एकाएक उफाळ्यानंतर खचून गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून दोन हेक्टर मधील

शेतातील विहीर खचून लाखोंचे नुकसान
वेदांत मेहरकुळे - गोंडपिपरी
येथून आठ किमी अंतरावर असलेल्या आक्सापूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतशिवारातील विहीर पाण्याच्या एकाएक उफाळ्यानंतर खचून गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून दोन हेक्टर मधील पिकाला धोका निर्माण झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
भूगर्भातील समतोल बिघडून सदर प्रकार घडल्याचा अंदाज परिसरातील शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. तालुक्यातील आक्सापूर येथील शेतकरी बाबुराव वारलु गव्हारे यांचे चंद्रपूर मार्गावर दोन हेक्टर १७ आर. शेत आहे. शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास बाबुराव गव्हारे यांचा मुलगा चंद्रजित गव्हारे हा धान पिकाला पाणी करण्यासाठी गेला असता, विहीरीच्याकडेला ठेवलेली आईल इंजिन सुरु असतानाच विहीरीतील पाण्याने एकाएक उफाळा मारुन विहिरीच्या तोंडीवर अंदाजे पाच फूट उंचीवर दाब मारत पाणी लगेच खाली गेले.
हा प्रकार बघण्यासाठी चंद्रजितने आईल इंजिन जवळ जाताच पाण्याच्या उफाळ्याचा दाब कमी होवून पाण्याने विहीरीची दगडी तोंडी व आईल इंजिन तसेच इतर साहित्य विहिरीत जमीनदोस्त झाले. तर केवळ दोन फूट अंतरावर असलेल्या चंद्रजितच्या पाया जवळीलही जमीन खचली. मात्र तो थोडक्यात बचावला. असा प्रकार तालुक्यात प्रथमच घडला असून शनिवारी आक्सापूर परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी बाबुराव गव्हारे यांचे शेत गाठून बुडबुडे पाहण्यासाठी गर्दी केली.
यावर्षी अल्पवृष्टीमुळे तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना, बाबुराव गव्हारे यांनी ग्रामीण बँकेतून ९० हजार रुपयाचे कर्ज घेवून दोन हेक्टर १७ आर. क्षेत्रात भात पीक घेण्याचे ठरविले. मात्र विहिर खचल्यामुळे या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून जवाहर योजनेअंतर्गत मंजूर विहिर बांधकामात त्यांनी मजबुतीसाठी मंजुर निधी पेक्षा अधिक गुंतवणूक केल्याचे सांगितले. विहीर खचल्याने शेतातील धान पिकांना पाण्याअभावी धोका निर्माण झाला असून २० हजार रुपयाची आईल इंजिनही जमीनदोस्त झाल्याने गव्हारे हे आर्थिक संकटात सापडले आहेत.
प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याची प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी. (तालुका प्रतिनिधी)