उद्योगाच्या धुरामुळे शेतपिकांचे नुकसान
By Admin | Updated: September 20, 2014 23:48 IST2014-09-20T23:48:51+5:302014-09-20T23:48:51+5:30
वरोरा तालुक्यातील मजरा येथील बी.एस.ईस्पात कंपनीतील व इतर उद्योगातील धुरामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान देण्याचा अहवाल तालुका कृषी अधिकाऱ्यांना पाठविला आहे.

उद्योगाच्या धुरामुळे शेतपिकांचे नुकसान
चंद्रपूर: वरोरा तालुक्यातील मजरा येथील बी.एस.ईस्पात कंपनीतील व इतर उद्योगातील धुरामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान देण्याचा अहवाल तालुका कृषी अधिकाऱ्यांना पाठविला आहे. परंतु तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अभिप्राय देताना तांत्रिक कारण दाखवून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून प्रशासनाने दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ईस्पात कंपनी व ईतर उद्योगांमुळे मजरा येथील शेतपिकांचे उत्पन्न ५० ते ७० टक्के घटले. याची शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर २०१२ मध्ये नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षणाचा अहवाल पाठविण्यात आला. परंतु तालुका कृषी अधिकारी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहेत. कितीही प्रयत्न केले तरी धुरामुळे उत्पादनात वाढ होत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आपल्या अधिकार क्षेत्रात नुकसान ठरविण्याचे निकष ठरवून सर्वेक्षण करावे व कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, २०१२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणाची पडताळणी करून नुकसान भरपाई द्यावी, कंपनीचे पर्यावरण विषयक आॅडीट करून दोषी कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी, धुरामुळे शेत नुकसानीचे व इतर नुकसानीचे मोजमाप करण्याचे निकष तयार करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी अन्यायग्रस्त शेतकरी प्रशांत भरटकर व अन्य शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)