जमिनीचा मोबदला देण्यात शेतकऱ्यांची लूट

By Admin | Updated: April 8, 2016 01:00 IST2016-04-08T01:00:05+5:302016-04-08T01:00:05+5:30

गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाकरिता आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांची शेती अधीग्रहित करण्यात आली.

Looters of the farmers giving compensation for the land | जमिनीचा मोबदला देण्यात शेतकऱ्यांची लूट

जमिनीचा मोबदला देण्यात शेतकऱ्यांची लूट

गोसेखुर्द प्रकल्प : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
उदय गडकरी सावली
गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाकरिता आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांची शेती अधीग्रहित करण्यात आली. त्या शेतीचा मोबदला देताना मात्र शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली आहे. शिवाय जास्त जमीन जाऊनही कमी मोबदला देण्यात आला आहे, असे असले तरी आतापर्यंत एकाही लोकप्रतिनिधींनी किंवा शेतकऱ्यांनी या संदर्भात आवाज उठविला नाही.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामासाठी अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे अधीग्रहण केले. त्यात केवळ जेवढी जमीन गेली, तेवढ्याच जमिनीचा मोबदला त्या-त्या दरानुसार देण्यात आला. परंतु शेतामध्ये असलेल्या विहिरी, कुपनलिका, घरे, मोठमोठी झाडे, किंवा कुंपन या आणि तत्सम बाबींचा कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी त्या लाभापासून वंचीत राहिले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पाच्या कामासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या, त्या शेतीचे सिमांकन भूमी अभिलेख विभागाच्या मार्फतीने करण्यात येते. त्यात गोसेखुर्द प्रकल्प विभागाचे अधिकारीही उपस्थित राहतात.
परंतु सिमांकनाच्या वेळी प्रत्यक्ष जमिनीचीच आराजी गृहीत धरली जात आहे. मात्र शेतात असलेले घर, विहीर, झाडे, कुपनलिका, मोटारपंप, किंवा शेताला करण्यात आलेले कुंपन यांची नोंदच जाणीवपूर्वक घेतली जात नाही. शिवाय काही शेतकऱ्यांची अधिग्रहीत झालेली शेती प्रत्यक्षात जास्त असूनसुद्धा कागदोपत्री कमी दाखविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी प्रत्यक्ष अधिग्रहीत झालेल्या आराजीची दुरुस्ती करून देण्याच्या मागणीसाठी कार्यालयात चकरा मारतात. सतत पाठपुरावा करूनसुद्धा निगरगट्ट प्रशासन शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय मोबदल्यापासून वंचित राहावे लागत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या अधिग्रहीत झालेल्या शेतीचा मोबदला योग्य रितीने न देता या विभागाकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे.

Web Title: Looters of the farmers giving compensation for the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.