स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांची लूट
By Admin | Updated: February 14, 2016 00:55 IST2016-02-14T00:55:46+5:302016-02-14T00:55:46+5:30
तालुका अन्न पुरवठा विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायतस्तरावरील दक्षता कमिट्या फक्त कागदोपत्री आहेत.

स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांची लूट
प्रशासनाचे दुर्लक्ष : दक्षता कमिट्या वाऱ्यावर
आशिष देरकर गडचांदूर
तालुका अन्न पुरवठा विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायतस्तरावरील दक्षता कमिट्या फक्त कागदोपत्री आहेत. सरकारी स्वस्त धन्य दुकानदारांवर कोणाचाही वचक नसल्याने स्वस्त धान्य केंद्राकडून लाभार्थ्यांची लुट सुरू आहे.
गावातील शिधापत्रिका धारकांची लुट होऊ नये, अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शासकीय दराने गोरगरिबांना धान्य मिळावे, काळाबाजार होऊ नये म्हणून १५ आॅगष्ट २०१४ रोजी कोरपना तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीच्या आमसभेतून गावातील सरपंचाच्या अध्यक्षतेखाली व सचिव म्हणून तलाठी या पद्धतीने ११ सदस्यीय दक्षता समित्या नेमण्यात आल्या. आमसभेत दक्षता समितीचे कार्य समजावून सांगण्यात आले. मात्र दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडे वेळ नसल्यामुळे त्या फक्त कागदावर राहिल्या आहे. कोरपना तालुका अन्न पुरवठा विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांची लुट करीत आहे.
शासन निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकानदाराला प्रत्येक महिन्याचे धान्य आल्यानंतर तशी सूचना दक्षता समितीला द्यायची असते. विक्री झाल्यावर दक्षता समितीचे प्रमाणपत्र घेऊन पुढच्या महिन्याच्या धान्याची उचल करायची असते. मात्र कोरपना तालुक्यातील जवळपास सर्वच दक्षता समित्या कुचकामी ठरल्या आहेत. कोरपना तालुक्यात एकूण ९६ स्वस्त धान्य केंद्र्र आहे. बोटावर मोजण्या इतके दुकानदार ग्राहकांना शासकीय भावात धान्य देऊन सोबत बिल देतात. मात्र बहुतांश दुकानदार आगाऊ रक्कम घेऊन धान्याची विक्री करीत असल्याने ग्राहकांना ते खरेदी करावी लागत आहे.
कोरपना तालुक्यात अभय मुनोत यांनी अनेक गावांत जाऊन तेथील लोकांना धान्याचे शासकीय दर सांगून जनजागृती केली. गावातील लोकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी व तालुका निरीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्याने काही दुकानदारांवर कारवाईसुद्धा झाली. मात्र पुरावे मिळूनदेखील अनेक ठिकाणी कारवाई करताना अधिकारी दोषींची बाजू घेत असल्याने गैरप्रकाराला चालना मिळत आहे.