वाचनालयाचे रुप बदलणार
By Admin | Updated: March 3, 2016 01:06 IST2016-03-03T01:06:34+5:302016-03-03T01:06:34+5:30
बल्लारपूर शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरिता लागणारी सर्वच प्रकारची पुस्तके आता नगर परिषदेच्या वसंत सार्वजनिक वाचनालयात उपलब्ध होणार आहेत.

वाचनालयाचे रुप बदलणार
मुलींकरिता वेगळा कक्ष : स्पर्धा परीक्षेसाठी करणार मार्गदर्शन
बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरिता लागणारी सर्वच प्रकारची पुस्तके आता नगर परिषदेच्या वसंत सार्वजनिक वाचनालयात उपलब्ध होणार आहेत. एवढेच नव्हे तर अशा विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सोयही वाचनालयात करुन दिली जाणार आहे. महिलांकरिता वेगळे अभ्यास कक्ष राहणार आहे.
महाविद्यालयाचे शिक्षण घेत असलेले तसेच सुशिक्षित बेरोजगार कांही युवक-युवती या वाचनालयात अभ्यास करण्याकरिता, तद्वतच वर्तमानपत्रातून माहिती घेण्याकरिता नियमित येत असतात. पण, या वाचनालयाकडे नगर परिषदेच्या शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून वाचकांना गैरसोयीशी सामना करावा लागत आहे. याची झळ या विद्यार्थ्यांनाही अनेक प्रकारे बसत आहे. ही बाब न.प.च्या नवनिर्वाचीत शिक्षण सभापती वर्षा सुंचूवार यांनी मुख्याधिकारी विपीन मुदधा यांच्या कानावर घातली. मंगळवारी विपीन मुदधा हे स्वत: वाचनालयाची स्थिती बघायला गेले. याप्रसंगी अभ्यासाकरिता उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी त्यांच्या पुढे मांडल्या व स्पर्धा परीक्षेच्या तयारीची पुस्तके या वाचनालयात असावी, अशी मागणी केली. यावर मुदधा यांनी विद्यार्थ्यांकडून पुस्तकांची यादी मागितली व ही पुस्तके लवकरच येतील, असे आश्वासन दिले. वाचनलय सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत उघडे असावे, अशीही मागणी विद्यार्थ्याची होती. बुधवारपासून त्यावर अंमलबजावणीही झाली आहे. तद्वतच मुलींच्या अभ्यासाकरिता वेगळ्या कक्षाची सोय केली जात आहे. या वाचनालयाची व्यवस्था आणि स्वच्छतेबाबत दुरवस्था झाली आहे.
वाचनालयाची इमारत तसेच या इमारतीच्या सभोवतालच्या जागेचा कायापालट करण्याचे मुदधा यांनी ठरविले आहे. संरक्षक भिंत वा तारेचे कुंपण घालणे गरजेचे आहे. पुढे तेही केले जाणार असल्याचे मुदधा यांनी सांगितले. मुख्याधिकारी यांच्या या भेट व चर्चेप्रसंगी शिक्षण सभापती वर्षा सुंचूवार, श्रीनिवास सुंचूवार, पत्रकार मंडळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)