लोकमत ही खऱ्या अर्थाने लोकचळवळ
By Admin | Updated: March 17, 2016 01:28 IST2016-03-17T01:28:34+5:302016-03-17T01:28:34+5:30
लोकमत हे जनसामान्यांचे स्पंदन टिपणारे वृत्तपत्र आहे. लोकमतने सातत्याने तळागाळातील माणसांना न्याय देण्याची भूमिका घेतल्या.

लोकमत ही खऱ्या अर्थाने लोकचळवळ
मान्यवरांचा सूर : ‘लोकमत शिवार’ पुरवणीचे थाटात प्रकाशन
राजुरा : लोकमत हे जनसामान्यांचे स्पंदन टिपणारे वृत्तपत्र आहे. लोकमतने सातत्याने तळागाळातील माणसांना न्याय देण्याची भूमिका घेतल्या. लोकमत ही खऱ्या अर्थाने लोकचळवळ झाली आहे, असा सूर ‘लोकमत शिवार’ पुरवणीच्या प्रकाशनप्रसंगी पाहुण्यांनी व्यक्त केला.
स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात बुधवारी सायंकाळी लोकमत शिवार पुरवणीचा प्रकाशन समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी माजी आमदार सुभाष धोटे होते. मुख्य पाहुणे म्हणून माजी आमदार अॅड. वामनराव चटप, लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, लोकमतचे वितरण महाव्यवस्थापक संतोष चिपडा, तहसीलदार धर्मेश फुसाटे, ज्येष्ठ व्यापारी सतीश धोटे, नगरसेवक अनिल ठाकूरवार, प्रा. सत्यपाल कातकर, लोकमतचे प्रादेशिक विभाग प्रमुख गजानन चोपडे, चंद्रपूर ब्रँच मॅनेजर विनोद बुले, जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर, वितरण अधिकारी रवी अंबडवार आदी उपस्थित होते.
लोकमत वाचकांचा मेळावा आणि लोकमत सखी मंच सदस्यांचा मेळावा असे औचित्य साधून भरगच्च उपस्थितीत पाहुण्यांच्या हस्ते ‘लोकमत शिवार’ पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना माजी आमदार सुभाष धोटे यांनी लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांची आठवण काढली. ते म्हणाले, अत्यंत परिश्रमातून वाटचाल केलेल्या वृत्तपत्राने सामाजिक बांधिलकी जोपासली, म्हणूनच हे वृत्तपत्र पहिल्या क्रमांकाचे ठरले आहे. माजी आमदार अॅड. वामनराव चटप म्हणाले, वाचकांची आवड आणि कल ओळखून लोकमतने नेहमी मजकूर दिला आहे. सामाजिक समस्यांना वाचा फोडण्यासोबतच सर्वव्यापी माहिती देण्याची परंपरा या वृत्तपत्राने जोपासली आहे.
संपादक दिलीप तिखिले म्हणाले, महिलांची शक्ती समाजात मोठी आहे. सखी मंचच्या संस्थापिका दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या परिश्रमातून निर्माण झालेल्या सखी मंचने घेतलेली झेप सर्व तळागाळातील सखींना सामावून घेणारी ठरली आहे. शिवार पुरवणीच्या माध्यमातून या तालुक्यातील प्रश्न मांडण्यात आले आहेत. शासनाला निर्णय घेताना उपयुक्त ठरणारा मजकूर यात असल्याने शिवार दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समारंभादरम्यान सोनिया गांधी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत, स्वागतनृत्य सादर केले. यानिमित्त स्थानिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या ११ महिलांचा आणि लोकमतचे ज्येष्ठ वितरक दिगांबर भाके यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर यांनी केले. संचालन शहर प्रतिनिधी बी. यू. बोर्डेवार यांनी तर उपस्थितांचे आभार तालुका प्रतिनिधी आनंद भेंडे यांनी मानले.
याप्रसंगी सखी मंच तालुका संयोजिका जयश्री देशपांडे, शहर संयोजिका कृतिका सोनटक्के, लक्कडकोट संयोजिका शीला जाधव, रामपूर संयोजिका रिता पाटील, बल्लारपूर लोकमत तालुका प्रतिनिधी वसंत खेडेकर आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)