म्हाडा कार्यालयाला ठोकले कुलूप
By Admin | Updated: May 12, 2016 01:11 IST2016-05-12T01:11:20+5:302016-05-12T01:11:20+5:30
महानगरापासून काही अंतरावर असणाऱ्या नवीन चंद्रपूर येथील नागपूर गृह निर्माण व क्षेत्रविकास महामंडळाच्या

म्हाडा कार्यालयाला ठोकले कुलूप
शिवसेनेचे आंदोलन : विविध समस्यांची सोडवणूक करा
चंद्रपूर : महानगरापासून काही अंतरावर असणाऱ्या नवीन चंद्रपूर येथील नागपूर गृह निर्माण व क्षेत्रविकास महामंडळाच्या कार्यालयासमोर येथील शिवसेनेतर्फे बुधवारी सकाळच्या सुमारास घेराव आंदोलन करण्यात आले. म्हाडा निवासींच्या विविध समस्या सोडविण्यासाठी हे आंदोलन होत असताना कोणतेही वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी म्हाडा कार्यालयाला कुलूप ठोकले.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर जोरगेवार यांनी केले. वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने अखेर एका कनिष्ठ अधिकाऱ्याला निवेदन देऊन समस्या मांडण्यात आल्या. म्हाडाचे मुख्याधिकारी उपस्थित होऊन समस्या सोडवित नाही, तोपर्यंत कार्यालय सुरू केले जाऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती.
चंद्रपूरपासून काही अंतरावर म्हाडा वसाहत असून शासनाच्या या योजनेचा लाभ अनेकांनी घेतला. परंतु येथे अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. विशेष म्हणजे, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेले अधिकारी येथे कधीच उपस्थित राहत नाही आणि नागरिकांचे प्रश्न जैसे थे असतात. त्यामुळे त्रस्त झालेल्या जनतेने शिवसेनेच्या नेतृत्वात आंदोलनाची भूमिका घेतली. तब्बल चार ते पाच तास एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित न झाल्याने तिथे उपस्थित असलेल्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याला घेराव घालून समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यात प्रामुख्याने कार्यालयात मंजूर असलेले उपअभियंता व इतर कर्मचारी उपलब्ध करून द्यावे, चंद्रपूरचे कार्यालय गाळेधारकांच्या कामांसाठी कार्यान्वित करावे, थकीत रकमेवर लागणारा व्याजदर इतर जिल्ह्याप्रमाणे कमी करावा. प्रत्येक खुल्या मैदानात एक हातपंप द्यावा. म्हाडा वसाहतीला लागून असलेला हॉड अॅड कोल्ड मिक्स प्लँटवर कारवाई करण्यात यावी. म्हाडा कॉलनीत मार्केटची व्यवस्था करण्यात यावी. व्यापारी संकुल उभारावे, रस्ते नाल्याची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी, कालनीतील पथदिवे, नाल्या व कचरा निवारण्याची व्यवस्था म्हाडाने करावी किंवा ग्रामपंचायत किंवा महानगर पालिकेला सुपुर्द करावी. खेळाचे मैदान विकसित करून बालोद्यान उभारावे, विविध कॉलनीतील ओपन स्पेसला संरक्षण भिंत उभारून द्यावी, जडवाहतुकीला प्रतिबंध करण्यात यावे व ज्या गाळेधारकांनी गाळ्याची संपूर्ण रक्कम दिली, त्यांना नोंदणी करून देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता.
या आंदोलनात विकास वनकर, किशोर बोतुमवार, विनोद गरडवा, प्रवीण खनके, सुधीर मांजरे, विनोद गोल्लजवार, चंदन पाल, दिनेश व्याहाडकर, मुकेश गाडगे, नारायण खनके, बंटी लांजेवार, अमोल शेंडे, प्रकाश चंदनखेडे, राणी लोनगाडगे यांनी सहभाग घेतला. म्हाडा कार्यालयाला कुलूप ठोकल्याप्रकरणी कोणत्याही आंदोलनकर्त्यावर पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. (शहर प्रतिनिधी)