वरझडी येथे स्थानिकांना जमिनीचे पट्टे मिळवून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST2021-03-23T04:29:29+5:302021-03-23T04:29:29+5:30
सुभाष धोटे : वरझडी येथे होणार सल्ला शक्ती प्रतीक राजुरा : वरझडीसाठी १५ लाखांचे सामाजिक सभागृह आणि प्रवाशी निवारा ...

वरझडी येथे स्थानिकांना जमिनीचे पट्टे मिळवून देणार
सुभाष धोटे : वरझडी येथे होणार सल्ला शक्ती प्रतीक
राजुरा : वरझडीसाठी १५ लाखांचे सामाजिक सभागृह आणि प्रवाशी निवारा मंजूर करणार, या सोबत मूलनिवासी आदिवासी बांधवांना जमिनीचे पट्टे मिळवून देण्यात आपण आजपर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले असून यापुढे सुद्धा शासन दरबारी पाठपुरावा करणार, असा संकल्प आ. सुभाष धोटे यांनी जाहीर केला.
राजुरा तालुक्यातील इसापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वरझडी येथे आदिवासी समाजाचे सल्ला शक्ती प्रतीक बांधकामाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कोयाकूल कल्चरल डेव्हलपमेंट कमिटी मौजा वरझडीद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मूलनिवासी आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने आदिवासी डोल, वाद्य आणि नृत्याच्या माध्यमातून स्वागत केले. गोंडी धर्माचे संस्थापक परिकुपर लिंगो यांच्या मार्गर्शनाखालीच सल्ला शक्ती (सल्लेर घागरा) चे प्रतीक आदिवासी गुड्यावर किंवा गावागावात उभारले जाते. सल्लेर घागरचे उद्देश मातृशक्ती व पितृशक्तीच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या शक्तीचे प्रतीक म्हणजे सल्ला शक्ती असे मानले जाते. याप्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, सरपंच भीमराव सोयाम, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुण निमजे, सभापती मुमताज अब्दुल जावेद, नगराध्यक्ष सविता टेकाम, जि.प. सदस्य डॉ. नामदेव करमरकर, माजी जि. प. सदस्य सीताराम कोडापे, उपसरपंच दिलीप डोईफोडे, नानाजी आदे, उपसभापती मंगेश गुरनुले, शामराव कोटनाके, पं.स. सदस्य रामदास पुसाम, लिंगू पाटील, आनंद मेश्राम, मुरलीधर आत्राम, केशव कुळमेथे, साईनाथ सोयाम, अरविंद मेश्राम व गावकरी उपस्थित होते.