कर्ज प्रकरणे मंजूर मात्र निधी नाही!
By Admin | Updated: September 20, 2014 01:35 IST2014-09-20T01:35:50+5:302014-09-20T01:35:50+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास

कर्ज प्रकरणे मंजूर मात्र निधी नाही!
नागरिकांची कार्यालयाकडे धाव : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत १०६ प्रकरणे मंजूर
दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोली
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत १०६ कर्ज प्रकरणे १४ आॅगस्ट २०१४ रोजी महामंडळाच्या मुंबई मुख्य कार्यालयाकडून मंजूर करण्यात आले. मात्र राज्य शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे जिल्ह्यातील चांभार समाजाचे नागरिक व्यवसायापासून वंचित राहिले आहेत. शुक्रवारी अनेक चांभार बांधवांनी कर्जाकरिता महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र कर्ज मिळत नसल्याने रोष व्यक्त केला.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत लघु उद्योगासाठी दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या १२ पोट जातीतील नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यातील चांभार समाजातील नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले. जिल्ह्यात जवळपास १३६ नागरिकांनी कर्ज योजनेकरीता महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज सादर केले. या कार्यालयाने सदर कर्जाचे प्रस्ताव महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडे पाठविले. या प्रस्तावाची छाणणी करून मुख्य कार्यालयाने १०६ नागरिकांची कर्ज प्रकरणे मंजूर केली. मंजूर झालेल्या नागरिकांना लघु व्यवसायासाठी प्रत्येकी ५० हजार रूपये कर्ज वितरित करण्यात येणार आहे. कर्ज मिळणार असल्याच्या आशेवर जिल्ह्यात अनेक चांभार बांधव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात येऊन वारंवार विचारणा करतात. मात्र निधी उपलब्ध झाली नसल्याची माहिती मिळताच परत जातात. गेल्या महिनाभरापासून चांभार समाज बांधव कर्जासाठी वारंवार या कार्यालयाकडे चकरा मारीत असल्याचे दिसून येते. शासनाचे कर्ज उपलब्ध झाल्यास छोटासा उद्योग सुरू करण्याचा माणस अनेक समाज बांधवांनी बाळगला आहे. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे या समाज बांधवांच्या स्वप्नावर पाणी फेरत असल्याचे दिसून येते. केवळ चार टक्के अल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्याची ही महामंडळाची योजना आहे. या समाजातील नागरिकांची अत्यंत बिकट परिस्थिती असल्यामुळे हे नागरिक अन्य बँकांकडून कर्ज घेऊ शकत नाही, अशी स्थिती आहे.
कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच
जिल्ह्यातील चांभार समाजासह अन्य दारिद्र्य रेषेखालील १२ पोटजातीतील नागरिकांना कर्ज उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावे या हेतूने राज्य शासनाच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. वर्षभरापूर्वी या महामंडळाचे जिल्हा कार्यालय येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीत सुरू करण्यात आले. मात्र या महामंडळाच्या कार्यालयाला स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी नाही. चंद्रपूरच्या जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आठवड्यातून तीन दिवस गडचिरोली येथे येऊन या कार्यालयाचा कारभार सांभाळतात. अनेकदा या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने अनेक नागरिक निराश होऊन परत जातात. शासनाने कार्यालय सुरू केले मात्र या कार्यालयात स्वतंत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नाही. यामुळे या कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर आहे.