घरात राहणे हाच संसर्गावर उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:00 AM2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:29+5:30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सायंकाळी संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी जारी केली आहे. हा निर्णय देशहितार्थ आहे. या काळामध्ये नागरिकांना मूलभूत प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. आज सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, पाणी पुरवठा तसेच आवश्यक आरोग्य सुविधा या परिस्थितीत जनतेला कशा पद्धतीने उपलब्ध करावी, यासंदर्भात चर्चा केली.

Living at home is the only solution to infection | घरात राहणे हाच संसर्गावर उपाय

घरात राहणे हाच संसर्गावर उपाय

Next
ठळक मुद्देकुणाल खेमनार : नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जगभरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असताना भारतातही ही संख्या वाढत आहे. वैद्यकीय सुत्रानुसार यावर केवळ अलिप्त राहणे, घरात राहणे हाच इलाज असून त्यामुळे नागरिकांनापुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे की त्यांनी संचारबंदीच्या संपूर्ण काळात घरीच राहावे, प्रशासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी बुधवारी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सायंकाळी संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी जारी केली आहे. हा निर्णय देशहितार्थ आहे. या काळामध्ये नागरिकांना मूलभूत प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. आज सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीमध्ये त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, पाणी पुरवठा तसेच आवश्यक आरोग्य सुविधा या परिस्थितीत जनतेला कशा पद्धतीने उपलब्ध करावी, यासंदर्भात चर्चा केली. चंद्रपूर महानगरपालिकेने निराश्रीत, गरीब व ज्यांच्याकडे रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. अशा सर्व नागरिकांसाठी महानगरपालिका हद्दीत कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी नागरिकांना दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र हे भोजन त्यांना पार्सल स्वरूपात अर्थात घरी घेऊन जाण्यासाठी मिळणार आहे. यासाठी महानगरपालिकेने ०७१७२-२५४०१४ टेलिफोन सेवा उपलब्ध केली आहे.
शहर व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्थित राहावा, वीज पुरवठा नियमित स्वरूपात राहावा, यासाठी निर्देश देण्यात आले आहे. नागरिकांना घरी थांबण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेले आहे. कोरोना हा आजार केवळ अलगीकरण प्रक्रियेतूनच नियंत्रणात येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता घरीच राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाऊन म्हणजे तो जिथे असेल त्याने तिथे थांबणे, असे देशभर अपेक्षित आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बाहेर राज्यातील नागरिक, अन्य जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिक, मजूर ,कामगार, या काळामध्ये अडकून पडले आहेत. मात्र इतर जिल्ह्यातही चंद्रपूरचे अनेक नागरिक अडकून पडले आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रशासन अशा नागरिकांची काळजी घेत आहे.

एकही रुग्ण पाझिटिव्ह नाही
जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये सध्या बाहेर देशातून आलेल्या ४५ नागरिकांना निगराणीत ठेवण्यात आले आहे. जवळपास ४९ नागरिकांना होम क्वॉरेन्टाईन करण्यात आले होते. त्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. आज केवळ एका नागरिकाला होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. लंडन वरून आलेल्या कुटुंबाचा अहवाल यायचा बाकी आहे. जिल्ह्यात बुधवारीपर्यंत एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नाही.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ ते ५
पुढील १४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये संपूर्ण संचारबंदी राहणार आहे. याकाळात जीवनावश्यक वस्तू सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेतच खरेदी करता येणार आहे. मात्र यासाठी झुंबड उडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये मुबलक साठा उपलब्ध असून गरजेनुसार तो आणखी प्रमाणात उपलब्ध केल्या जाईल. तसेच भाजीपाला, दूध आदी जीवनावश्यक वस्तू नियमित स्वरूपात मिळाव्या, यासाठी प्रशासन कार्यरत असून कोणत्याही वस्तूचा तुटवडा पडणार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता नजीकच्या दुकानांमधून केवळ आवश्यकतेनुसार खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी स्वस्त धान्य दुकानातून तीन महिन्यांचे रेशन उपलब्ध करून देण्यात येत आहे.

वरोरा तालुक्यातील ४०० प्रवाशी होम क्वारंटाईनमध्ये
वरोरा : वरोरा शहर व परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी राज्यातील तसेच इतर राज्यातील विविध शहरांमध्ये गेले होते तर काही कामगार म्हणूनदेखील इतर शहरांमध्ये कामाला आहे. यापैकी अनेकांनी कोरोनाच्या भीतीने गावाकडे कूच केली आहे. असे प्रवाशी गेल्या काही दिवसात वरोरा शहरात तसेच तालुक्यात पोहचले. २१ मार्च ते २५ मार्चपर्यंत एकूण ४०० प्रवाशांनी स्वत: उपजिल्हा रुग्णालय गाठून स्वत:ची माहिती दिली व आरोग्याची तपासणी करून घेतली, अशा सर्वांना होम क्वारंटाईनचे शिक्के मारून घरी पाठविण्यात येत आहे.
पोलीस कडक कारवाई करणार
संचारबंदी या आजाराशी संबंधित उपचार आहे.मात्र काही बेजबाबदार प्रवृत्ती अशा वेळी रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळून येत आहे. एकमेकांचा संपर्क हा यातील सर्वात मोठा धोका असून त्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. अशा काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्हा प्रशासनाने अशा विनाकारण गर्दी करणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्याचा सपाटा सुरू केला असून गुरुवारी पोलीस या संदर्भात आणखी कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Living at home is the only solution to infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.