मच्छीगुड्याच्या नशिबी उपेक्षिताचं जीणं
By Admin | Updated: September 9, 2015 00:54 IST2015-09-09T00:54:35+5:302015-09-09T00:54:35+5:30
आदिवासी बांधवाच्या विकासासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबवित

मच्छीगुड्याच्या नशिबी उपेक्षिताचं जीणं
शंकर चव्हाण जिवती
आदिवासी बांधवाच्या विकासासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबवित असल्याचा दावा शासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र जिवती तालुक्यातील मच्छीगुड्यातील नागरिकांना विकास म्हणजे काय, हे अजूनही या वस्तीला माहित नाही. विकासाची कुठलीच योजना आजवर त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. गावात जायला धड रस्ता नाही. प्यायला योग्य पाणी नाही. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या समाजाला घरकुल दिले नसल्याने आजही येथील नागरिक पडक्या घरात जीवन जगत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. प्रस्तुत प्रतिनिधी या गावात भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे अवलोकन केले असता, गावकऱ्यांनी ‘लोकमत’पुढे आपल्या व्यथा मांडल्या.
जिवती तालुक्यातील भारी ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या मच्छीगुडा गावात १२ घरांची वस्ती आहे. जेमतेम ६० लोकसंख्या असलेल्या या गावाचे नाव तालुक्याच्या नकाशावर असले तरी अंगणवाडीशिवाय कुठलीच शासकीय योजना गावात पोहोचली नाही. गेल्या चार वर्षांपूर्वी या वस्तीत विजेचे खांब उभे करण्यात आलेत, मात्र अद्यापही विजेचा दिवे लावण्यात न आल्याने गावकऱ्यांना रात्रीच्या सुमारास अंधाराचा सामना करावा लागत आहे. जीवती पंचायत समितीच्यावतीने येथील लोकांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पिण्यास मिळावे याकरिता हातपंप लावण्यात आले.
मात्र तेही अल्प कालावधीतच बंद पडले. त्यामुळे त्या नागरिकांना नाल्यावरच्या झऱ्यातील दूषित पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. राहायला योग्य घर नाही, जायला धड रस्ता नाही, हे खरे गावकऱ्यांचे दुखणे आहे. या मूलभूत प्रश्नांसाठी गावकऱ्यांचा अनेक वर्षांपासूनचा लढा सुरू आहे. पण गेली पन्नास वर्षे वेदनेचे हुंकार देत जगणाऱ्यांचा आक्रोश आजवर राज्यकर्त्यांच्या कानी कधी पोहचलाच नाही.
त्यामुळे नागरिकांमध्ये शासन प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आम्ही कुठवर असं उपेक्षिताचं जीवन जगायचं, असा प्रश्न मच्छिगुडा वस्तीत राहणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला.
खांब आहेत; पण वीज पुरवठा नाही
मच्छीगुड्यातील अंधार दूर व्हावा, यासाठी वीज वितरण कंपनीने गेल्या चार वर्षापूर्वी विद्युत खांब उभे केले. काही दिवस विजेचा प्रकाशही गावात दिला. मात्र त्यानंतर मात्र वीज पुरवठा बंद झाला, तो अद्यापही सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य आहे. अनेक वेळा गावकऱ्यांनी ग्रामसेवकापुढे समस्या मांडण्याचा प्रयत्न केला; पण कुणीही लक्ष दिले नसल्याने आजही नागरिकांना अंधाराचे जीवन जगावे लागत आहे. तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे.