गावकऱ्यांची एकजूट ठरली शेतकऱ्यासाठी जीवदान !
By Admin | Updated: March 17, 2017 00:52 IST2017-03-17T00:52:42+5:302017-03-17T00:52:42+5:30
तालुक्यातील केळी येथील एका सधन कास्तकाराचे २०० क्विंटल कापूस केवळ गावकऱ्यांनी दाखविलेल्या एकजुटीच्या प्रयत्नामुळे

गावकऱ्यांची एकजूट ठरली शेतकऱ्यासाठी जीवदान !
केळी येथील घटना : कापसाची गंजी आगीपासून बचावली
वरोरा : तालुक्यातील केळी येथील एका सधन कास्तकाराचे २०० क्विंटल कापूस केवळ गावकऱ्यांनी दाखविलेल्या एकजुटीच्या प्रयत्नामुळे आगीपासून वाचले. ही घटना १० मार्चच्या रात्री घडली.
केळी येथील कास्तकार राजू पाटील झापर्डे यांच्या घरात २०० क्विंटल कापसाची गंजी होती. भाव कमी असल्यामुळे त्यांनी कापूस विकला नव्हता. घरात असलेल्या गंजीतून रात्री अचानक धूर निघत असल्याचे राजू पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. गावकऱ्यांना ही वार्ता कळताच सर्व नागरिक त्यांच्या मदतीला धावून आले.
केळी हे गाव चंद्रपूर जिल्ह्यात येत असले तरी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पासून अगदी १८ किमी अंतरावर आहे. नागरिकांनी अग्निशमन विभागाला सूचना दिली व गावकऱ्यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले. गावकऱ्यांनी शेकडो क्विंटल कापूस आगीपासून वाचविला. यानंतर आलेल्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले. तरी या आगीत शेतकऱ्याचे ८ लाखांचे नुकसान झाले; मात्र मोठी हानी टळली.
रात्रीला ही घटना कळताच काँग्रेसचे नेते डॉ. विजय देवतळे व डॉ. आसावरी देवतळे, वसंतराव विधाते गुणवंत भोयर, बंडू टीपले, साईनाथ टोंगे, संजय महाजन, किशोर भलमे, साळवे, भारत घुबडे, शाम बलखंडे, विकास डांगरे, बंडू गोल्हर, वरोरा तहसीलदार आणि तलाठी यांनी घटनास्थळाला भेट देऊन राजू झापर्डे यांचे सांत्वन केले. या घटनेमुळे ‘गाव करी ते राव ना करी’ या म्हणीचा प्रत्यय आला. (तालुका प्रतिनिधी)