साहित्य निर्मिती सकस हवी; उचलेगिरीला भविष्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST2021-07-09T04:18:39+5:302021-07-09T04:18:39+5:30
साहित्य परिषद महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. निर्मला पाटील, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रा. संजीव कोंडेकर यांच्या संकल्पनेतून ही मुलाखत घेण्यात आली. साहित्य ...

साहित्य निर्मिती सकस हवी; उचलेगिरीला भविष्य नाही
साहित्य परिषद महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. निर्मला पाटील, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रा. संजीव कोंडेकर यांच्या संकल्पनेतून ही मुलाखत घेण्यात आली. साहित्य परिषद गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. संतोष डाखरे व संजय गोडे यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीतून थुटे गुरुजींचा साहित्यिक प्रवास श्रोत्यांसाठी उलगडला. सहजता व साधेपणा हा मनुष्याचा नैसर्गिक स्वभावगुण असतो. परंतु प्रसिद्धी व प्रतिष्ठा यामुळे अहंकार उसळी मारत असतो. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. आपल्या विरोधी लोकांबाबतही असुया नसावी. तेव्हाच सहजता ही स्वभावातील सवय बनते, याकडेही ना. गो. थुटे यांनी लक्ष वेधले. आयुष्याचा अभिलेख हे आत्मकथन म्हणजे मी कसा जगलो व वागलो याचे प्रांजळ रेकॉर्ड आहे. शिक्षकी पेशात असताना विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण प्रयोग केले. शैक्षणिक व अन्य साहित्यिक कामाचा लेखाजोखा म्हणजे आयुष्याचा अभिलेख होय, अशी भूमिका थुटे यांनी मांडली.
मुलाखतीसाठी विभागीय अध्यक्ष पुष्पा बोंडे यांनी पुढाकार घेतला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर झाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संजय कालर यांचेही सहकार्य लाभले.
आपण आपली रेषा मोठी करावी
आयुष्यावर संत तुकोबाराय आणि साने गुरुजींचा प्रभाव असल्याचे ना. गो. थुटे यांनी सांगितले. या महापुरुषांच्या जीवनातील सत्याची मांडणी व दीनदुःखितांची निरपेक्ष सेवा मनाला भावली. बहुजन समाजात अलीकडे अस्मिता निर्माण झाल्या आहेत. परंतु प्रतिभा असूनही त्यांना मुख्य प्रवाहात प्लॅटफॉर्म मिळत नाही. मात्र, आपण आपली रेषा मोठी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
विचारवंतांचे मौन जास्त धोकादायक
शेतकरी, बेरोजगारी, महागाई, सामाजिक विद्वेष व शासनाची भूमिका यावर भाष्य करताना ना. गो. थुटे म्हणाले, ‘सध्या जे काही देशात चाललेय, ते चिंताजनक आहे. परंतु यावर देशातील प्रस्थापित बहुसंख्य साहित्यिक व विचारवंतांनी मौन बाळगणे जास्त धोकादायक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
४५ ग्रंथांमधून मांडला जीवनानुभव
ना. गो. थुटे यांनी वयाची ८२ वर्षे नुकतीच पूर्ण केली. ‘आयुष्याचा अभिलेख’ हे आत्मकथन अलीकडेच प्रकाशित झाले आहे. ‘गीते स्वागते’ या पहिल्या कवितासंग्रहापासून सुरू झालेल्या साहित्यिक प्रवासात त्यांनी ४५ पुस्तके लिहिली. त्यामध्ये ११ समीक्षाग्रंथ आहेत. दोन अभ्यासकांनी त्यांच्या साहित्यावर आचार्य पदवी मिळविली. महाराष्ट्र शासनाने १९८६ मध्ये त्यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला आहे.
.............