नागरिकांच्या सहकार्याशिवाय दारूबंदी अशक्य
By Admin | Updated: March 13, 2017 00:43 IST2017-03-13T00:43:41+5:302017-03-13T00:43:41+5:30
जिल्ह्यात झालेल्या दारूबंदीच्या मोहिमेत जिल्हा पोलीस प्रशासन उत्तमरीत्या कार्यरत आहे. पोलीस आपल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन प्रामाणिकरीत्या कर्तव्य पार पाडत आहे.

नागरिकांच्या सहकार्याशिवाय दारूबंदी अशक्य
विशेष पोलीस महासंचालक : मूल पोलीस स्टेशनला भेट
मूल : जिल्ह्यात झालेल्या दारूबंदीच्या मोहिमेत जिल्हा पोलीस प्रशासन उत्तमरीत्या कार्यरत आहे. पोलीस आपल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन प्रामाणिकरीत्या कर्तव्य पार पाडत आहे. यावेळी त्यांच्या जीवाला धोकाही आहे. दारूबंदीच्या काळात जिल्ह्यात अनेक घटना अशा घटना घडल्या आहेत.दारूबंदी योजना यशस्वी होण्यासाठी पोलीस प्रशासनातील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी कटीबद्ध आहे. परंतु काही मंडळी दारूबंदीच्या विधायक योजनेला काळीमा फासण्याचा प्रयत्न करीत आहेत. याविषयी खंत व्यक्त करताना दारूबंदीच्या चळवळीत पोलीस प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक प्रतापसिंग पाटणकर यांनी केली.
शासकीय कामानिमित्त विशेष पोलीस महासंचालक प्रतापसिंग पाटणकर यांनी नुकतीच मूल पोलीस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली. यादरम्यान झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांचेसह उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदार उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत विशेष पोलीस महासंचालक पाटणकर यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कामगिरीबाबत चर्चा करताना पत्रकार हा आरसा असून चौथा स्तंभ म्हणून लोकशाही प्रणालीत समाज सुधारणेसाठी त्यांचा सहभाग मोलाचा आहे. जनता, राजकारणी, पत्रकार आणि पोलीस या चौघांनी प्रामाणिकरित्या काम केल्यास विघातक शक्तीचा बिमोड होवून समाजात आनंद देमारे नंदनवन निर्माण होवू शकते. असा आशावाद व्यक्त केला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे, उपाध्यक्ष भोजराज गोवर्धन, सचिव विनायक रेकलवार, ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण नखाते, प्रा. चंद्रकांत मनियार, गुरूदास गुरनुले, राजू गेडाम, रमेश माहुरपवार, दीपक देशपांडे, अशोक येरमे, युवराज चावरे, गंगाधर कुनघाडकर, शशीकांत गणवीर आदी उपस्थित होते.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती संजय मारकवार यांचे नेतृत्वात बाजार समितीचे सभापती घनश्याम येनूरकर, संचालक राकेश रत्नावार, शांताराम कामडी, माजी नगरसेवक मोतीलाल टहलियानी आणि बाबा अझीम यांनीही पोलीस महासंचालक पाटणकर यांची भेट घेवून स्वागत केले. (तालुका प्रतिनिधी)