समीक्षा समितीचा अहवाल सादर होताच लीकर लाॅबी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:52 IST2021-03-13T04:52:27+5:302021-03-13T04:52:27+5:30
चंद्रपुरातही पूर्वी असलेले बार ॲण्ड रेस्टाॅरंट दारूबंदी होताच भाड्याने दिले होते. काहींनी भाडेकरूंना पुन्हा दारू सुरू होण्याच्या आशेने खाली ...

समीक्षा समितीचा अहवाल सादर होताच लीकर लाॅबी सक्रिय
चंद्रपुरातही पूर्वी असलेले बार ॲण्ड रेस्टाॅरंट दारूबंदी होताच भाड्याने दिले होते. काहींनी भाडेकरूंना पुन्हा दारू सुरू होण्याच्या आशेने खाली करण्याच्या हालचाली सुरू केल्याचीही माहिती आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी झाली. राज्यात सत्तांतर होताच चंद्रपूरची दारूबंदी उठण्याची चर्चा चवीने रंगू लागल्या. महाविकास आघाडी सरकारने दारूबंदीवर पुनर्विचार करण्यासाठी समीक्षा समिती गठित केली. या समितीने नुकताच आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. यानंतर चंद्रपूरची दारूबंदी शासन उठविणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. याबाबत चंद्रपूरचे पालकमंत्री यांनी ट्वीट करून शासन समीक्षा समितीचा अहवाल मंत्रिमंडळापुढे ठेवतील, यानंतर दारूबंदीबाबतचा योग्य निर्णय शासन घेतील, असे म्हटले आहे; मात्र अहवाल सादर होताच चंद्रपुरातील लीकर लाॅबी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
अहवाल रहस्यमय
समीक्षा समितीने अहवालात नेमके काय नमूद केले आहे, याबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे; मात्र लीकर लाॅबी दारूबंदी उठवण्याच्या अनुषंगानेच हा अहवाल असल्याचा अर्थ काढत असल्याचे एकंदर चित्र आहे. कोरोनामुळे राज्य शासन आर्थिक अडचणीत सापडलेले आहे. चंद्रपूरची दारूबंदी उठविल्यास मोठा महसूल शासनाच्या तिजोरीत येईल, या अनुषंगानेही चंद्रपूरची दारूबंदी उठविली जाण्याची चर्चा लीकर लाॅबी करीत असल्याचे बोलले जात आहे.