घोडपेठ येथील विजेचा खांब धोकादायक
By Admin | Updated: December 29, 2014 23:40 IST2014-12-29T23:40:59+5:302014-12-29T23:40:59+5:30
येथील वॉर्ड क्रमांक चारमधील विजेचा खांब पूर्णपणे जीर्ण झाला असून कोणत्याही क्षणी तो उन्मळून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खांब पडून जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

घोडपेठ येथील विजेचा खांब धोकादायक
घोडपेठ : येथील वॉर्ड क्रमांक चारमधील विजेचा खांब पूर्णपणे जीर्ण झाला असून कोणत्याही क्षणी तो उन्मळून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खांब पडून जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विजेचा खांब घोडपेठवासीयांसाठी सध्या धोकादायक ठरत आहे. हा खांब बदलविण्यात यावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
घोडपेठ येथील वैशाली डुडुरे यांच्या घराजवळील हा विद्युत खांब जवळपास ४० वर्ष जुना आहे. त्यामुळे खांबाचा जमिनीत असलेला भाग पूर्णपणे सडलेला असून कोणत्याही क्षणी हा खांब पडू शकतो.
या रस्त्यावरुन दिवसभर रहदारी सुरु असते. लहान मुले त्या ठिकाणी खेळत असतात. तसेच आजूबाजूला लोकवस्ती असल्याने हा खांब एखाद्या घरावर पडून जिवीतहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यासंदर्भात अनेकदा ग्रामस्थांकडून वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे लेखी तक्रारी देण्यात आल्या; पण अधिकाऱ्यांनी आश्वासन देण्याव्यतिरिक्त काहीच केले नाही. २७ जूनरोजी हा जीर्ण खांब बदलण्यासंदर्भात वॉर्डातील नागरिकांनी भद्रावती येथील वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता यांना लेखी निवेदन दिले होते. मात्र कार्यालयात वारंवार चकरा मारुनही कार्यालयातील अधिकारी यांचेकडून यासंदर्भात साधे प्रयत्नही करण्यात आले नाहीत.
त्यामुळे लवकरात लवकर हा धोकादायक खांब बदलविण्यात यावा, अशी मागणी घोडपेठ वॉर्ड क्रमांक चारमधील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)