जीव गेला तरी चालेल, पण रस्ता होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 00:37 IST2017-06-20T00:37:26+5:302017-06-20T00:37:26+5:30
‘आमच्या घराला लागून जाणारा मार्ग आमच्यासाठी अडचणीचा व जीव घेणारा आहे. त्यामुळे या मार्गासाठी जीव गेला तरी चालेल, पण रस्ता होऊ देणार नाही’....

जीव गेला तरी चालेल, पण रस्ता होऊ देणार नाही
भिसी येथील महिलांचा एल्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
भिसी : ‘आमच्या घराला लागून जाणारा मार्ग आमच्यासाठी अडचणीचा व जीव घेणारा आहे. त्यामुळे या मार्गासाठी जीव गेला तरी चालेल, पण रस्ता होऊ देणार नाही’ असा खणखणीत इशारा भिसी येथील महिलांनी ग्रा.पं.मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला.
नव्याने तयार करण्यात येणारा मार्ग शंकरपूर, भिसी, महालगाव, चिमूर, मासळ, पळसगावमार्गे मूल असा जाणार आहे. सदर प्रस्तावित ९५ कि.मी.च्या मार्गासाठी ३७८ कोटी रुपये निधी आ. कीर्तीकुमार भांगडीया यांनी प्रयत्नाने मंजूर झाल्याची भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. शिवरकर यांनी जाहीर केली होते. यावर पत्रकार परिषदेत सरपंचानी चांगलेच आसूड ओढले.
यावेळी प्रभारी सरपंच लिलाधर बन्सोड यांनी या मार्गासंबंधी भिसी ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती संबंधित विभागाने दिलेली नाही. तसेच सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुध्दा कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. नियमानुसार ग्रामपंचायतीच्या हद्दीत कसल्याही प्रकारचा सर्व्हे करताना स्थानिक ग्रा.पं.ची परवानगी घेणे आवश्यक असते. परवानगी न घेता सर्व्हे करण्याचा प्रकार बालिशपणाचा वाटतो. एकंदरीत कोणत्याही रस्त्याचे काम मंजूर करताना सर्वप्रथम सर्व्हे करून निविदा काढून मंत्रालयातून मंजुरी मिळवावी लागते, असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.
त्यामुळे रस्ता पीडित महिलांनी अगोदर आम्हाला सर्व सुखसोयींसह नवीन घरे बांधून द्यावीत, त्यानंतर खुशाल रस्त्याचे काम करावे, अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली. यावेळी पत्रकार परिषदेला सरपंच अरविंद रेवतकर, घनश्याम डूकरे तंमुस अध्यक्ष भाऊराव ठोंबरे, गोपीनाथ ठोंबे, कृषीभूषण मोरेश्वर झाडे, हरी बानकर, बंडू तुंबक, जिना मस्के, चिंचुलकर, नागपूरे, आदी उपस्थित होते.