चंद्रपुरातील जीवघेणी वाहतूक
By Admin | Updated: February 10, 2016 00:56 IST2016-02-10T00:56:43+5:302016-02-10T00:56:43+5:30
चंद्रपूर शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाहतूक शाखेकडून चौकाचौकात सिग्नल लावण्यात आले. मात्र ते कधी बंद तर कधी चालू राहतात.

चंद्रपुरातील जीवघेणी वाहतूक
भरधाव वाहनांवर कारवाई शून्य : अपघाताच्या संख्येत वाढ
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाहतूक शाखेकडून चौकाचौकात सिग्नल लावण्यात आले. मात्र ते कधी बंद तर कधी चालू राहतात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी निर्माण होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. रस्त्याच्या लगत वाहने उभी ठेवणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे या वाहनांमुळेही वाहतुकीचा प्रश्न सतत निर्माण होत असून शहरवासींयाना या समस्येला वारंवार तोंड द्यावे लागत आहे. मात्र यावर अद्यापही उपाययोजना झालेल्या नाही.
चंद्रपूर शहरात सतत घडणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा आवश्यक आहे. पोलीस व आरटीओ विभागाकडून गत आठ-पंधरा दिवसांपूर्वी वाहतूक सप्ताह पाळण्यात आला. मात्र या सप्ताहाच्या काळातच अनेक चौकात वाहतूक विस्कळीत होताना दिसली. सप्ताहाच्या नावावर सर्व वाहतूक शिपाई कार्यालयात आयोजित प्रदर्शनात गुंतले होते. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तिनतेरा वाजले. जटपुरा गेटवरील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक युवक सुसाट वेगाने वाहने चालवितात. मात्र त्यांच्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही.
- प्रमोद बुरांडे, तुकूम
वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांची चौकाचौकात नियुक्ती करण्यात अांली. मात्र अनेक वाहतूक शिपाई केवळ उभे दिसून येतात. वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्यावर ते जागेवरून हलत असतात. अनेकदा सिग्नलवर वेळेआधीच वाहनचालक वाहन हाकतात. अशा चालकांवर बोटावर मोजण्याइतकीच कारवाई झालेली आहे.
- श्रीकांत खडसे,
विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर.
अनेक चौकातील सिग्नल नियमित सुरू राहत नाही. तर अनेक चौकात वाहतूक शिपाई राहत नाही. त्यामुळे याचा फायदा घेत युवक भरधाव वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. यावर प्रतिबंध घालण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालून वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक आहे.
- सुरज गुरूनुले,
जटपुरा गेट, चंद्रपूर.
वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये विशिष्ट काळात वाहतूक शिपाई तैनात केला जाते. परंतु, तो अनेकदा आपल्या जागेवर उपस्थितच राहत नाही. त्यामुळे वाहनधारकांकडून वाहतुकीचे नियम तोडण्याचा प्रकार घडतो. अनेकदा अपघातही घडले आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी तरी निदान वाहतूक शिपायांनी नेमून दिलेल्या जागी हजर राहावे. म्हणजे वाहतूक विस्कळीत होणार नाही.
- प्रवीण कातोरे,
बापटनगर चंद्रपूर.
चंद्रपूर शहरातील महत्वाचे ठिकाण असलेल्या जटपुरा गेटवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. यातून नागरिकांना अकारण मनस्ताप सहन करावा लागते. अनेकदा या ठिकाणी वाहतूक पोलीसच नसतात. त्यामुळे वर्दळीला शिस्त नसते. परिणामी अर्धा किलोमीटरपर्यंत वाहतूक तुंबलेली असते. त्यामुळे या ठिकाणी तरी वाहतूक शिपाई पूर्ण वेळ ठेवणे गरजेचे आहे.
- विशाल चौधरी,
रहमतनगर, चंद्रपूर.
कस्तुरबा गांधी मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालणे आवश्यक आहे. या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश दिला जात असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते. यात अपघातही घडले आहे. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देऊन अवजड वाहनधारकांवर कारवाई आवश्यक आहे.
- संतोष तपासे,
सरकारनगर चंद्रपूर.
वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नियमीत वाहतूक दिवे सुरू राहणे व शिपाई उपस्थित राहणे आवश्यक आहे. भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई सुरू केल्यास चौकातून भरधाव वेगाने धावणारे वाहने दिसणार नाही.
- सुरेश रघटाके,
चंद्रपूर.