मृत्यूच्या दाढेतून ‘रोहण’ला मिळाले जीवनदान
By Admin | Updated: July 5, 2017 01:04 IST2017-07-05T01:04:53+5:302017-07-05T01:04:53+5:30
जन्मत: अज्ञान आजाराने त्रस्त असलेल्या आठ महिन्यांच्या रोहणच्या आईवडीलांची परिस्थिती हालाखीची. उपचारासाठी पैसे नसताना मरणाच्या दारात असलेल्या रोहणला ...

मृत्यूच्या दाढेतून ‘रोहण’ला मिळाले जीवनदान
मुनगंटीवारांच्या पत्राचा आधार : आठ महिन्यांच्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : जन्मत: अज्ञान आजाराने त्रस्त असलेल्या आठ महिन्यांच्या रोहणच्या आईवडीलांची परिस्थिती हालाखीची. उपचारासाठी पैसे नसताना मरणाच्या दारात असलेल्या रोहणला सेवाअभावी संस्था व ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राचा आधार मिळाला. त्यामुळे रोहण आज मृत्यूच्या दाढेतून बाहेर निघाला असून बालक सुखरुप आहे.
मूल तालुक्यातील नागाळा येथील रोहण नामदेव भोयर असे बालकाचे नाव आहे. मूल तालुक्यातील नागाळा येथील नामदेव भोयर यांना आठ महिन्यांपूर्वी मुलगा जन्माला आला. तो जन्मत: वयोमानानुसार डोके शरीरापेक्षा मोठे असल्याने त्याला इतरत्र वैद्यकीय उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आजार हा शस्त्रक्रियेविना होणार नसल्याने पैशाअभावी आई-वडीलाने हातवर केले. स्वत:चा प्रपंच भागविताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने लाखोंची रक्कम कुठून आणायची? असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता.
त्यानंतर त्यांनी रोहणच्या उपचाराकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गावातील शिक्षिका एच. एस. वडेट्टीवार, शाळेचे शिक्षक जे.आर. मुस्कटे यांनी ही माहिती आरोग्य शिबिरात प्रमोद खोब्रागडे यांच्या लक्षात आणून दिली.
पंचायत समिती मूल येथे कार्यरत वसीम काझी, सुप्रिया मेश्राम, संदीप सुखदेव या युवा कर्मचाऱ्यांनी जनसेवा ग्रामीण संस्था व शिक्षण परिषद यवतमाळ, टाटाट्रस्ट यांच्याकडे पाठपुरावा करुन नागपूर येथे शासकीय महाविद्यालयात रोहणला आणण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्राचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पत्र नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुखास देण्यास आले.
जनसेवा ग्रामीण संस्था, ना. मुनगंटीवार यांच्या पत्रामुळे रोहणवर शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग मोकळा झाला. मागील २६ जूनला रोहणवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. घरात अठराविश्व दारिद्र्य असलेल्या भोयर कुटुंबाला समाजातील चांगल्या व्यक्तीची साथ मिळाल्याने रोहणला नवीन जीवन मिळाले आहे.
समाजात असे असंख्य रोहण असतील, त्यालाही समाजातील व्यक्तींनी आधार दिला तर मृत्यूच्या दाढेत असलेल्या बालकांना सुद्धा नवजीवन देता येईल.
जन्मत: आजार असतानाही परिस्थितीअभावी आई-वडील रोहणवर उपचार करू शकले नाही. मात्र त्यांना ना. मुनगंटीवार आणि सामाजिक संस्थाचा आधार मिळाला. रोहणवर वेळीच उपचार मिळाल्याने तो आता बरा होणार आहे.