हत्या करून अपघाताचा देखावा करणाऱ्यास जन्मठेप
By Admin | Updated: April 8, 2016 00:53 IST2016-04-08T00:53:12+5:302016-04-08T00:53:12+5:30
एका इसमाची हत्या करून त्याचा अपघात झाला, असा देखावा करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

हत्या करून अपघाताचा देखावा करणाऱ्यास जन्मठेप
चंद्रपूर : एका इसमाची हत्या करून त्याचा अपघात झाला, असा देखावा करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
५ जानेवारी २०१४ रोजी जगदीश पंचवानी हे अष्टभुजा रेल्वे पुलाजवळ जखमी अवस्थेत पडून असलेले आढळले. त्यांच्या बाजुला त्यांची दुचाकीही पडली होती. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी जगदीश पंचवानी यांना रुग्णालयात दाखल केले. अज्ञात वाहनचालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली असेल, असा प्राथमिक अंदाज होता. दरम्यान, डॉक्टरांनी पंचवानी यांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता सदर घटना अपघात नसून घातपात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याप्रकरणी ११ जानेवारी २०१४ रोजी रवी दुर्गाराम कनकुंटलवार याला अटक केली. अधिक तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी साक्षिदार तपासून योग्य पुराव्याच्या आधारे आरोपी रवी कनकुंटलवार यास बुधवारी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. (शहर प्रतिनिधी)