सेवानिवृत्तीधारकांना ‘जीवन’ प्रमाणपत्र
By Admin | Updated: November 30, 2014 23:01 IST2014-11-30T23:01:20+5:302014-11-30T23:01:20+5:30
सेवानिवृत्तांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण हयात असल्याचे प्रमाणपत्र दरवर्षी सादर करुन त्रास सोसावे लागत होते. आता हा त्रास दूर होणार आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी

सेवानिवृत्तीधारकांना ‘जीवन’ प्रमाणपत्र
महा ई-सेवा केंद्रात होणार नोंदणी : आधार क्रमांक जोडले जाणार बँक खात्याशी
चंद्रपूर : सेवानिवृत्तांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण हयात असल्याचे प्रमाणपत्र दरवर्षी सादर करुन त्रास सोसावे लागत होते. आता हा त्रास दूर होणार आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेतर्गंत सेवानिवृत्तांना ‘जीवन’ प्रमाणपत्र दिले जाणार असून या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे.
ज्यांना पेंशनचा लाभ मिळत आहे, अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन प्रमाणपत्रासाठी नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र शासनाचे तसे निर्देश असून या प्रमाणपत्रासाठी आधार क्रमांकासोबत बँक खाते जोडले जाणार आहे. या प्रमाणपत्रासाठी महा-ई सेवा केंद्रात नोंदणी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. सेवानिवृत्त पेेंशनधारकांना दरवर्षी बँकेत जावून हयात असल्याचे प्रमाण द्यावे लागते. पेंशन देणाऱ्या एजन्सीला लिखित स्वरुपात पुरावे द्यावे लागतात. त्यानंतरच पेंशन विभाग सेवानिवृत्त लाभार्थ्यांच्या खात्यात पेंशन जमा करत असते. पेंशन धारकांना या सर्व असुविधांपासून मुक्त करण्यासाठी त्यांच्या पेंशन खात्यासोबत आधार क्रमांक जोडून बायोमेक्ट्रीक्स यंत्राद्वारे नोंद करण्यात येईल व लगेचच जीवन प्रमाणपत्र देण्यात येईल.
जीवन प्रमाणपत्राची नोंद करण्याकरीता नजीकच्या महा-ई सेवा केंद्रावर नोंदणी करावी लागणार आहे. राजुरा येथे जीवन प्रमाणपत्र नोंदणी सुरु झाली आहे. याचा फायदा घेण्याचे आवाहन महा-ई सेवा केंद्रद्वारे करण्यात आले आहे. त्यामुळे आता सेवानिवृत्तधारकांना सादर करावे लागणाऱ्या प्रमाणपत्रातून सुटका मिळणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)