बीआयटीच्या पुढाकारातून दीडशे शेतकऱ्यांना आधुनिकतेचे धडे
By Admin | Updated: December 14, 2015 01:16 IST2015-12-14T01:16:38+5:302015-12-14T01:16:38+5:30
निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट होत असल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार संकटाचा सामना करावा लागत आहे.

बीआयटीच्या पुढाकारातून दीडशे शेतकऱ्यांना आधुनिकतेचे धडे
कृषी प्रदर्शन : बल्लारपूर, राजुरा व पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभाग
चंद्रपूर : निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट होत असल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलाजीने पुढाकार घेत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या अनुषंगाने गेल्या काही महिन्यापासून कृषी जीवन विकास प्रतिष्ठानतर्फे ठिकठिकाणी शेतीबाबत कार्यशाळा घेतली जात आहे. या कार्यशाळेला युवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन नागपुरात सुरू झाले आहे. या प्रदर्शनात आधुनिक शेतीचे धडे घेण्यासाठी बीआयटीचे अॅड. बाबासाहेब वासाडे यांच्या पुढाकारातून बल्लारपूर, राजुरा व पोंभूर्णा तालुक्यातील दीडशे शेतकरी शनिवारी नागपुरला रवाना झाले.
नागपुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात हरीतगृह तंत्रज्ञान, सेंद्रीय शेती, फळ प्रक्रिया, जमिनीचे आरोग्य कार्ड, दुग्ध व्यवसाय, धान उत्पादन तंत्रज्ञान, बांबू लागवड, जवस पीक, फुल शेतीअशा प्रकारच्याविषयांवर चाळीसपेक्षा जास्त कार्यशाळा व शेती तज्ज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. बीआयटीने यापूर्वीच जवस पीक व इजराईलच्या धर्तीवर शेतीबाबत कार्यशाळा तालुकास्थळावर घेतल्या आहे. जवस पीक कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय कृषी तज्ज्ञ डॉ.माई यांनी चंद्रपूर जिल्ह्यात कृषी तंत्रज्ञानासाठी पालकत्त्व स्वीकारले होते. नागपूरच्या अॅग्रो व्हिजनमध्येही त्यांचा मोठा वाटा असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती व पीक पद्धतीतील बदलाबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी अॅड.बाबासाहेब वासाडे यांनी १७ गावातील शेतकऱ्यांना पाठविले आहे. या प्रदर्शनात राजुरा, बल्लारपूर, व पोंभूर्णा तालुक्यातून गेलेले शेतकरी आधुनिक शेतीचे धडे घेणार आहे.
शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अॅड.बाबासाहेब वासाडे व जि.प.च्या माजी अध्यक्षा वैशाली वासाडे यांच्या उपस्थितीत शेतकरी नागपूरसाठी रवाना झाले. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू, जि.प. सस्य अविनाश जाधव, पळसगावचे सरपंच शंकर खोब्रागडे, कोठारीचे उपसरपंच अमोल कातकर, कळमनाचे उपसरपंच सुनील बावणे, इटोलीचे उपसरपंच धाडू दुधबळे, संतोष इटनकर, नामदेव बावणे, किन्हीच्या सरपंच जीवनकला आलाम, रवीकांत गोरे, बाबा डाखरे, आनंदराव गावंडे, भाऊजी जाधव आदींचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)