१२ गावांनी फिरविली निवडणुकीकडे पाठ
By Admin | Updated: June 26, 2016 00:38 IST2016-06-26T00:38:35+5:302016-06-26T00:38:35+5:30
तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. ९ जुलैला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

१२ गावांनी फिरविली निवडणुकीकडे पाठ
एकही नामांकन आले नाही : विकासासाठी उपसले बहिष्काराचे अस्त्र
जिवती : तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत. ९ जुलैला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिवती तालुक्यात एकूण २२ ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. पण यापैकी १२ गावे मिळून असलेली पुडियाल मोहदा व केकेझरी या दोन ग्रामपंचायतीतील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने ९ जुलैला केवळ २० ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उपरोक्त दोन ग्रामपंचायतीसाठी एकही उमेदवारी अर्ज भरण्यात आला नाही.
जिवती तालुक्यात पुडियाल मोहदा या ग्रामपंचायतची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत पुडियाल मोहदा, कुंबेझरी, लेंडीगुडा, भोलापठार, पळसगुडा, पद्मावती, इंदिरानगर, अंतापूर, नारायणगुडा, येसापूर, वणी (बु.), व शंकर लोधी अशा एकूण १२ गावांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या गावाचा कारभार त्यातच २०-२५ कि.मी अंतरावरुन ग्रामपंचायतस्थळी जनतेला ये- जा करणे कठीण झाल्याने या १२ गावातील जनतेनी ग्रामपंचायतीचे विभाजन करून सहा- सहा गावाची मिळून दोन ग्रामपंचायत तयार करण्यात याव्या, यासाठी वरिष्ठ पातळीपर्यंत मागणी रेटून धरली. मात्र प्रशासनाने याची साधी दखलही घेतली नाही. या मागणीकडे दुर्लक्ष करून परत १२ गावांना मिळून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यावर येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त करुन निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.
पुडियाल मोहदा ही ग्रामपंचायत तालुक्यात लोकसंख्येने व क्षेत्रफळाने सर्वात मोठी असून सदर ग्रामपंचायतचे विभाजन होणे विकासाच्या दृष्टीने गरजेचे आहे. शासन नियमाप्रमाणे सहा महिने अगोदर विभाजनाच्या प्रस्तावाची सर्व प्रक्रिया ग्रामपंचायतीने पूर्ण केली. परंतु शासनाने हा प्रस्ताव परत केला. (तालुका प्रतिनिधी)
पुडियाल मोहदा ग्रामपंंचायतीत १२ गावांचा समावेश असून याठिकाणी अनेक समस्या आहेत. नदीवर पूल नाही, डांबरीकरणाचे रस्ते नाहीत. एकंदरीत २०-२५ कि.मी. अंतरावरुन ग्रामपंचायतीत येणे नागरिकांना त्रासदायक असून जोपर्यंत ग्रा.पं.चे विभाजन होत नाही, तोपर्यंत बहिष्कार कायम राहणार.
- दत्तात्रेय कांबळे
उपसरपंच, पुडियाला मोहदा.
गुरुवारला उपविभागीय अधिकारी व मी स्वत: गावात जाऊन लोकांना बहिष्कार मागे घ्या, यासंदर्भात समजूत काढली. पण जनता ऐकण्याच्या मनस्थितीत नसून बहिष्कार कायम राहणार, असे सांगितले. नागरिकांच्या तशा मागणीसंदर्भात अहवाल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
- के. वाय. कुनारपवार
तहसीलदार, जिवती