नगरपंचायतीच्या मागणीसाठी सिंदेवाहीकरांची निवडणुकीकडे पाठ
By Admin | Updated: December 5, 2015 00:55 IST2015-12-05T00:55:35+5:302015-12-05T00:55:35+5:30
राज्यातील सर्व तालुकास्थळे नगरपंचायत झाल्या असताना केवळ सिंदेवाहीला नगरपंचायतीचा दर्जा दिला नाही.

नगरपंचायतीच्या मागणीसाठी सिंदेवाहीकरांची निवडणुकीकडे पाठ
सर्वपक्षीय निर्णय : अखेरच्या दिवशी केवळ चार नामांकन
सिंदेवाही : राज्यातील सर्व तालुकास्थळे नगरपंचायत झाल्या असताना केवळ सिंदेवाहीला नगरपंचायतीचा दर्जा दिला नाही. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीकडेच पाठ फिरविली आहे.
सिंदेवाही ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यानुसार या निवडणुकीसाठी आज शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र सायंकाळी ५ वाजतापर्यंत केवळ चार जणांनी फार्म भरले. सिंदेवाहीला नगर पंचायतीचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी सिंदेवाहीकरांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे. याला सर्व पक्षीय नेत्यांनी साथ दिली आहे.
आज शेवटच्या दिवशी तालुका संघर्ष समितीच्या पुढाकाराने सर्वपक्षाच्या नेत्यासोबत चर्चा करुन संपूर्ण फार्म भरण्यात आले नाही. शासनाला नगर पंचायत करावीच लागेल, असा एकमुखी इशारा सिंदेवाहीच्या नागरिकांनी यानिमित्त शासनाला दिला आहे. आधीच सिंदेवाही ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक बसले आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण तालुकास्थळे नगरपंचायतीत रुपांतरित होवून निवडणुकाही झाल्या. नगराध्यक्षही बसले. मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे सिंदेवाही नगरपंचायत घोषित होऊ शकले नाही. त्यामुळे सिंदेवाहीची जनता चांगलीच संतापली आहे. (शहर प्रतिनिधी)