गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात सोडा
By Admin | Updated: December 4, 2015 01:24 IST2015-12-04T01:24:22+5:302015-12-04T01:24:22+5:30
परिसरातील शेतकऱ्यांच्या घोडाझरी पाणी संघर्ष समितीच्या वतीने गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात आणण्याकरिता चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते ...

गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात सोडा
अशोक नेते : घोडाझरी विकास परिषदेत आंदोलनाचा इशारा
तळोधी (बा.): तळोधी (बा.) परिसरातील शेतकऱ्यांच्या घोडाझरी पाणी संघर्ष समितीच्या वतीने गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात आणण्याकरिता चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत नुकतीच घोडाझरी विकास परिषद तळोधी (बा.) येथे पार पडली. या घोडाझरी विकास परिषदेत गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात सोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका खासदार अशोक नेते यांनी घेतली.
या विकास परिषदेला भाजपा तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, तालुका सरचिटणीस गजानन पाथोडे, जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, पं.स. सदस्य दिवाकर कामडी, नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यातील ५२ गावांचे शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रास्ताविक भाषणातून ईश्वर कामडी यांनी १ नोव्हेंबर २०१५ ला घोडाझरी पाणी प्रश्नांवर पहिली विकास परिषद घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाची यादी वाचनू दाखवली तर भाजपाचे जिल्हा महामंत्री संजय गजपूरे यांनी घोडाझरी तलावाचा इतिहास, कमी पावसामुळे परिसरात निर्माण झालेला दुष्काळ, गोसीखुर्द धरणाचे कालवाच्या कामातील त्रुटी, यावर प्रकाश टाकला. गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात टाकल्यास या परिसरातील शेतकऱ्यांना काय फायदा होईल, हे सांगून आजपर्यंत घोडाझरी तलावाच्या पाणी प्रश्नांवर शासनाने शेतकऱ्यांचे मतप्रदर्शन लक्षात घेतले असते आज ही वेळ आली नसती असे सांगून तलावात पाणी सोडण्यासोबत तलावाच्या वितरणिकाचे सिमेंटीकरण व साफसफाई किती आवश्यक आहे, हे खासदार नेते यांच्या निदर्शनात आणून दिले.
यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खासदार नेते यांनी आपण काम करणारा माणूस असून गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात आणून सोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी शेतकऱ्यांना ग्वाही दिली व या संदर्भाचे गोसीखुर्द प्रकल्पाचा समावेश पंतप्रधान सिंचन योजनेत करावा, यासाठी दोन दिवसापूर्वीच पत्र दिल्याचे आवर्जुन सांगितले.
घोडाझरी सिंचन क्षेत्रात ५२ गावांचा समावेश असून तलावात पाणी नसल्याने या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळाले नाही व एका पाण्याने पिक गेले. अशावेळी शेतकऱ्यांची काय अवस्था होते, याची मला जाणीव आहे. त्यामुळेच मी मागील दोन महिन्यात घोडाझरी पाणी प्रश्नांवर घेतलेली ही तिसरी बैठक असल्याचे सांगितले. राज्यशासन आणि केंद्र शासन शेतकऱ्याप्रति सकारात्मक आहे. परंतु त्यांना शेतकऱ्यांच्या सिंचन प्रश्नावर काम करण्यास पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी बोलताना नागभीड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी खासदारांकडे होमदेव मेश्राम यांनी करताच शेतकऱ्यांनी दुष्काळ नको, पाणी हवे अशाप्रकारची मागणी करुन त्यांना पुढे बोलूच दिले नाही. यावेळी उपस्थितांनी खासदार नेते यांना कमी खर्चात, कमी वेळात व जास्त कष्ट न घेता गोसीखुर्दचे पाणी घोडाझरी तलावात कसे सोडता येईल याची प्रतिकृतीच सादर केली. एकंदरीत या बैठकीला उपस्थित शेतकरी पाणी प्रश्नांवर आक्रमक व अभ्यासंपूर्ण तयारी करुन हजर असल्याचे चित्र पहावयास मिळाले. मात्र खासदारांनी दिलेली ग्वाही पुढील शेतीच्या हंगामापूर्वी पूर्ण करणार काय, राजकारणी व्यक्तीचे आश्वासन खरे मानायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. तरीही आश्वासनाची पूर्तता होईल काय, हे येणारा काळच सांगू शकते. (वार्ताहर)