आसोला मेंढा तलावाचे पाणी सोडा
By Admin | Updated: November 3, 2014 23:23 IST2014-11-03T23:23:56+5:302014-11-03T23:23:56+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी अपुरा व उशिरा पाऊस झाल्याने धानोत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे आसोला मेंढा तलावाचे पाणी सोडून धान

आसोला मेंढा तलावाचे पाणी सोडा
चंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी अपुरा व उशिरा पाऊस झाल्याने धानोत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे आसोला मेंढा तलावाचे पाणी सोडून धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष वामनराव झाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. मूल, सावली, गोंडपिंपरी, ब्रह्मपुरी, सिंदेवाही या भागातील शेतकऱ्यांना आसोला मेंढा तलावाचे पाणी मिळत असते. यावर्षी कमी पावसामुळे व उशिरा रोवण्या झाल्यामुळे आता धानपीक धोक्यात आले आहे. धानपिकाला पाण्याची आवश्यकता असताना संबंधित विभागाचे अधिकारी पाणी देण्यासाठी टाळाटाळ करीत असून हातचे पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चार- पाच दिवसांत आसोला मेंढाचे पाणी न सोडल्यास संपूर्णत: दुष्काळाची स्थिती निर्माण होणार आहे. सावली तालुक्यात हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्प आहे. तेथील पाणी फक्त गडीसुर्ला गावापुरतेच मर्यादित आहे. सदर जलसिंचन प्रकल्प वैनगंगा नदीवर असल्यामुळे या प्रकल्पाचे पाणी बेंबाळ, नांदगाव, दिघोरीपर्यंत सोडल्यास परिसरातील धानाचे पीक वाचणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सिंचन खात्यांना आदेश देऊन पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी झाडे यांनी केली आहे. यावेळी रामगुंडे, पिंपळकर, राकेश वानखेडे, भगत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)