ऑक्सिजन सोडा, साधा जनरेटरही नाही; केअर सेंटरमध्ये रुग्ण घामाघूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:29 IST2021-04-27T04:29:00+5:302021-04-27T04:29:00+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या व ज्यांच्या घरी विलगीकरणाची व्यवस्था नाही, अशा रुग्णांना शासनाच्या ...

ऑक्सिजन सोडा, साधा जनरेटरही नाही; केअर सेंटरमध्ये रुग्ण घामाघूम
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या व ज्यांच्या घरी विलगीकरणाची व्यवस्था नाही, अशा रुग्णांना शासनाच्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येते. जिल्ह्यात --- कोविड केअर सेंटर आहेत. यातील वनअकादमी, सैनिक स्कूल, समाजकल्याण वसतिगृह, आदी कोविड केअर सेंटर वगळता ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटरमध्ये साधा ऑक्सिजन, जनरेटरची व्यवस्था नाही. ग्रामीण भागात वेळी-अवेळी बंद पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रुग्णांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान देशपातळीवर उच्च स्थानी असते. त्यामुळे दरवर्षी येथे उष्माघाताचे बळीसुद्धा मोठ्या प्रमाणात पडत असतात. मार्च महिन्यापासून चंद्रपूरचे तापमान ४४ अंशांवर पोहोचले आहे. परंतु, बहुतांश कोविड केअर सेंटरमध्ये कुलरचीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे अंगाची लाहीलाही होणाऱ्या या उन्हामुळे जीव कासावीस होत असतो. परिणामी रुग्णांना कोरोनापेक्षा उकाड्याचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.
बॉक्स
एप्रिल तापला
चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान उच्च स्थानी असते. मार्च महिन्यात जिल्ह्याचे तापमान ४० अंशांपार गेले होते, तर चंद्रपूरचे तापमान ४५ अंशांवर गेले आहे. मे महिन्यात तर तापमान ४८ अंशांपार जाते. त्यामुळे सीसीसी केंद्रामध्ये कुलरची व्यवस्था करणे गरजेचे आहे, अन्यथा कोरोनासोबत उष्माघाताचा धोकाही संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बॉक्स
अत्यावश्यक असेल तरच सिलिंडर वापरा
तालुका स्तरावरील काही सीसीसी केंद्रांमध्ये तीन ते चार ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, अत्यावश्यक असेल तरच त्याचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांना जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये रवाना करण्यात येते.
------
कोरोनापेक्षा उकाड्याचाच त्रास
मला कोरोनाची लक्षणे नाहीत. परंतु, अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सीसीसी केंद्रात उपचार घेत आहे. परंतु, येथे कुलरची व्यवस्था नसल्याने उकाडा जाणवतो. केंद्रात फॅन आहेत. परंतु, वाढत्या तापमानामुळे तेसुद्धा गरम हवा फेकत असतात.
-रुग्ण
------
कोरोनाच्या त्रासासोबतच उकाड्याचाही त्रास सहन करावा लागतो. एवढा मोठा हाॅल आहे. परंतु, येथे बोटावर मोजण्याइतके फॅन आहेत. केवळ दोन कुलर लावले आहेत. परंतु, ऐवढ्या मोठ्या सभागृहाला त्याची हवा पुरत नाही.
-रुग्ण