कोरपन्याचा निवडणूक विभाग लिपिकाविना
By Admin | Updated: October 5, 2014 23:03 IST2014-10-05T23:03:40+5:302014-10-05T23:03:40+5:30
कोरपना येथील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागामधील लिपिकाची राजुराला बदली झाल्यामुळे पद रिक्त आहे. या ठिकाणी नवीन लिपिकांची नियुक्ती न करण्यात आल्याने निवडणूक विषयक कामे रखडली आहेत.

कोरपन्याचा निवडणूक विभाग लिपिकाविना
वनसडी : कोरपना येथील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागामधील लिपिकाची राजुराला बदली झाल्यामुळे पद रिक्त आहे. या ठिकाणी नवीन लिपिकांची नियुक्ती न करण्यात आल्याने निवडणूक विषयक कामे रखडली आहेत.
सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम असल्याने निवडणूक विभागाचे काम वाढले आहे. या विभागात सद्यस्थितीत एक नायब तहसीलदार, संगणक आॅपरेटर व शिपाई हे काम सांभाळत आहेत. मात्र महत्वाचे लिपीक पदच रिक्त असल्याने अनेक कामे रेंगाळली आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त, अतिमागास तालुक्याची प्रशासन व्यवस्था आॅक्सिजनवर चालली असल्याचे दिसते. जबाबदारी येऊन ठेपली असल्याने रात्रंदिवस एक करुन नायब तहसीलदार, संगणक आॅपरेटर, लिपीक आपली कामे उरकविण्याचा प्रयत्न करत आहे. कर्तव्यदक्षतेमुळे त्यांचे जेवढे कौतुक करावे, तेवढे कमी आहे. या निवडणूक विभागातील महिन्याभरापूर्वी संगणक नादुरुस्त होता. तो दुरुस्त करण्यात आला असला तरी प्रिंटरची वाणवा आहे. नादुरुस्त अवस्थेत असलेल्या प्रिंटरमुळे मिळेल त्या ठिकाणावरून प्रिंटर आणण्याची नामुश्की कर्मचाऱ्यांवर ओढवली आहे.
लिपीकाअभावी माहिती वेळेवर मिळू शकत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागाते आहे. निवडणूक विभागात ओळखपत्र तयार करणे, मतदार नोंदणी, मतदार नाव शोध, वोटर स्लीप आदि महत्वाची कामे केली जातात. परंतु आवश्यक यंत्रणेअभावी विभागातील कामे रेंगाळली आहेत.
निवडणूक विभागातील तांत्रिक समस्या व लिपिक पदभरती त्वरीत करुन या कार्यालयाची रखडलेली कामे मार्गी लावली, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)