डिजिटल लर्निंग लॅबोरेटरी वर्ल्ड ऑन व्हिल्स वाहनाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST2021-02-05T07:34:42+5:302021-02-05T07:34:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोरपना : ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडविण्यासाठी दालमिया भारत फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. सामाजिक दायित्वातून ...

डिजिटल लर्निंग लॅबोरेटरी वर्ल्ड ऑन व्हिल्स वाहनाचा शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडविण्यासाठी दालमिया भारत फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. सामाजिक दायित्वातून संगणक व डिजिटल साक्षरता निर्माण करणाऱ्या डिजिटल लर्निंग लॅबोरेटरी वर्ल्ड ऑन व्हिल्स या वाहनाचा शुभारंभ नुकताच जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आला.
कोरपना तालुक्यातील नारंडा येथे असलेल्या मुरली सिमेंट प्लांटलगतच्या गावात ही बस फिरणार आहे. मार्च २०२२पर्यंत ६००हून अधिक विद्यार्थी, स्वयंसहायता बचत गटांच्या महिला, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, प्लांटमधील सुरक्षा कर्मचारी तसेच शेतकऱ्यांना संगणक व तंत्रज्ञान साक्षर करण्याचा मानस दालमिया भारत फाऊंडेशनने व्यक्त केला आहे.
या कंपनी परिसराच्या पाच किलोमीटर कार्यक्षेत्रात असलेल्या गावांमध्ये प्राधान्याने हा उपक्रम राबविण्यात येईल. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा सेविका, स्वयंसहायता महिला बचतगट, आदींच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना संगणक साक्षर करण्याचा प्रयत्न होईल. ई-मेल तयार करणे व पाठवणे, बँकिंग सेवा, शासकीय कागदपत्र काढणे आणि संगणकाचा मुलभूत वापर करणे आदींचे प्रशिक्षण या बसच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. सुरुवातीला २४० जणांनी प्रशिक्षित होण्यासाठी अनुकूलता दाखवली असून, कोविड नियमांचे पालन करत या कोर्सची सुरुवात होणार आहे. त्यासाठी काही बॅचेस तयार करण्यात आल्या आहेत. दरम्यान, डिजिटल लर्निंग लॅबोरेटरी वर्ल्ड ऑन व्हिल्सचा शुभारंभ चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखडकर, मुरली इंडस्ट्रीज दालमिया सिमेंट (भारत) लि.चे प्रमुख हकिमुद्दीन अली, सुनीलकुमार भुसारी (टेक्निकल हेड), कमर्शियल हेड गिरीश सोमाणी, एडमीन हेड चंद्रदीप टामटा, पराग पापंट्टीवर (व्यवस्थापक - HR), सी. एस. आर. व्यस्थापक प्रशांत भिमनवार, अरविंद ठाकूर, कॉम्पुटर ट्रेनर गौरव वांढरे, समूह संघटक लक्ष्मण कुळमेथे उपस्थित होते.