‘चित्रांश’च्या लुथडेला पोलीस कोठडी
By Admin | Updated: July 4, 2015 01:46 IST2015-07-04T01:46:06+5:302015-07-04T01:46:06+5:30
ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन महिन्यापूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चंद्रपुरातून पसार झालेल्या चित्रांश टेक्नॉलॉजीच्या

‘चित्रांश’च्या लुथडेला पोलीस कोठडी
नागपुरातून अटक : एप्रिलमध्ये फसवणुकीचा गुन्हा
चंद्रपूर : ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन महिन्यापूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चंद्रपुरातून पसार झालेल्या चित्रांश टेक्नॉलॉजीच्या संजय लुथडेला रामनगर गुन्हे शोध पथकाने गुरुवारी नागपुरातून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संजय लुथडे याच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुक प्रकरणी भादंवि ४२०, ३४ अन्वये एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. मूळची जयपूर राजस्थानची असलेल्या चित्रांश टेक्नॉलॉजी या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विदर्भातील अनेक जिल्ह्यात आपले जाळे पसरले आहे. चंद्रपूर येथे नगिनाबाग परिसरात हिस्लाप कॉलेजसमोर या कंपनीने कार्यालय थाटले. संजय लुथडे हा या कंपनीचा चंद्रपूर जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहत आहे.
जाहिरात प्रसारित करून त्या बदल्यात मासिक सात ते दहा हजार रुपये मानधन देण्याची हमी देत या कंपनीने अनेक गावगाड्यात अनेकांशी संपर्क करार केला. ३५ हजार रुपयात एक दूरचित्रवाणी संच आणि जाहिरातीची कीट देण्याची योजना या कंपनीने आखली. यासाठी काही तालुक्यात कंपनीने एजंट नेमले आहेत. सुरुवातीला काही ग्राहकांना तीन ते चार महिने धनादेश या कंपनीने दिले. मात्र, नंतर धनादेश देणे बंद केले.
तुकूम येथील सुगतनगर येथील रहिवासी राजेश चक्रवर्ती यांचे पैसे चित्रांश कंपनीने थकविले. चक्रवर्ती यांनी एप्रिल महिन्यात संजय लुथडेविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे लुथडेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. परंतु गुन्हा दाखल होताच लुथडे चंद्रपुरातून पसार झाला. तो नागपुरात असल्याची माहिती मिळताच रामनगर गुन्हे शोध पथकाने सापळा रचून लुथडेला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी मिळाली आहे.