शक्तिप्रदर्शनाने गाजला अखेरचा दिवस
By Admin | Updated: October 13, 2014 23:31 IST2014-10-13T23:31:43+5:302014-10-13T23:31:43+5:30
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी थांबली. अखेरच्या दिवशी सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांनी जिल्ह्यातील सहाही मतदार संघात प्रचार रॅली काढून

शक्तिप्रदर्शनाने गाजला अखेरचा दिवस
प्रचारतोफा थंडावल्या : गुप्त प्रचारातून मोर्चेबांधणीला वेग
चंद्रपूर : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी थांबली. अखेरच्या दिवशी सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांनी जिल्ह्यातील सहाही मतदार संघात प्रचार रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. कुणी चित्रपट अभिनेत्यांना आणले. तर कुणी स्थानिक नेत्यांना हाताशी घेऊन प्रचार यात्रा काढल्या. मोटारसायकल रॅलींचीही यात भर पडली होती. यामुळे त्यामुळे पाऊस येवूनही दिवसभर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
सोमवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावणार असल्याने सगळ्याच पक्षानी सकाळपासूनच प्रचाराला प्रारंभ केला. शहरातील मुख्य मार्गाने महिला कार्यकर्ते व दुचाकीस्वारांची रॅली काढून प्रचार करण्यात आला. त्यामुळे चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दुपारी एक वाजताच्या सुमारास शहरात अचानक पाऊस झाला. तरीही पावसावर मात करीत कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांचा जोशात प्रचार केला.
जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांपैकी बल्लारपुरातील भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी अभिनेता विवेक ओबेरायचा रोड शो झाला. मतदार संघातील पोंभूर्णा, उमरी, मूल शहरात या रोड शो दरम्यान नागरिकांची चांगलीच गर्दी उसळली होती. उर्जानगरच्या सभेत विवेक ओबेरॉयचे भाषणही झाले. बल्लारपुरातील काँग्रेसचे उमेदवार घनश्याम मुलचंदाणी यांनीही बल्लारपुरातील प्रचार कार्यालयापासून दुपारी जनसंपर्क रॅली काढली. भर पावसातही ही रॅली चिंब भीजत शहरात फिरली. तत्पूर्वी वायगाव निंबाळा, बोर्डा, मामला, वणी या ठिकाणी जावून मतदारांच्या भेटी घेतल्या.
राजुऱ्यात काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी अखेरच्या दिवशी पदयात्रा काढून जनसंपर्क साधला. व्यापारी वर्गाच्या भेटीगाठी घेवून त्यांनी सहकार्याचे आवाहन केले. अखेरचा दिवस असल्याने त्यांनी राजुऱ्यात प्रचार सभाही घेतली आणि मतदारांना आशिर्वाद मागितला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुदर्शन निमकर यांच्या प्रचारासाठी गडचांदुरमध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची जाहीर सभा होणार होती. मात्र पावसाळी वातावरणामुळे त्यांचे हेलिकॉप्टर पोहचू शकले नाही. तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता. त्यांच्या अनुपस्थितीतही सभा पार पडली. त्यानंतर गडचांदुरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
वरोऱ्यातील काँगे्रसच्या उमेदवार डॉ. आसावरी देवतळे यांनीही आज अखेरच्या दिवशी वरोऱ्यात पदयात्रा काढून जनसंपर्क साधला. पदयात्रेदरम्यान पाऊसही आला. तरीही यात खंड पडला नाही. या सोबतच चंदनखेडा, वायगाव, आष्टा या गावातही त्यांनी जनसंपर्क साधला.
ब्रह्मपुरीतील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनीही शहरातून लक्षवेधी प्रचार रॅली काढून जनसंपर्क साधला. शहरात अन्य उमेदवारांचञयाही प्रचार रॅली निघाल्या, मात्र या रॅलीच्या भव्यतेची चर्चा शहरात सुरू होती. अखेरच्या दिवसातील या व्यस्ततेत त्यांनी सावली तालुक्यात पाथरी, गांगलवाडीसह तीन ठिकाणी सभा घेतल्या.
चिमूरमध्ये भाजपा उमेदवार कीर्तीकुमार भांगडिया यांनीही अखेरच्या दिवशी जनसंपर्कावर भर दिला. प्रचार कार्यालयात आमदार मितेश भांगडिया यांनी जाहीर सभा घेवून मतदारांना सहकार्याचे आवाहन केले. तत्पूर्वी नेरी, भीसी येथेही जनसंपर्क साधला.
सोमवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी मंगळवारी दिवसभर आणि रात्री उमेदवारांकडून छुप्या पद्धतीने प्रचार केला जाणार आहे. महत्वाचे गट, संघटनांच्या गुप्त बैठकाही या काळात घेण्यात येतील. (जिल्हा प्रतिनिधी)