३० वर्षांपासून गोवरीवासीयांचा संघर्ष कायम
By Admin | Updated: April 6, 2016 00:44 IST2016-04-06T00:44:23+5:302016-04-06T00:44:23+5:30
गावाच्या सभोवताल कोळसा खाणींचे जाळे पसरले. कोळसा उत्खननासाठी जमिनी अधीग्रहन झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कोळसा खाणींसाठी जमिनी दिल्या.

३० वर्षांपासून गोवरीवासीयांचा संघर्ष कायम
वेकोलिच्या दुष्परिणामांचा मनस्ताप : उपाययोजना करण्यासाठी चालढकल
प्रकाश काळे गोवरी
गावाच्या सभोवताल कोळसा खाणींचे जाळे पसरले. कोळसा उत्खननासाठी जमिनी अधीग्रहन झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कोळसा खाणींसाठी जमिनी दिल्या. परिणामी जमिनीचा कोरभर तुकडाही आता शिल्लक नाही. कोळसा खाण परिसरात डेंजरझोन मध्ये येणारी गावे वेकोलिने दत्तक घेतली. त्यामुळे वेकोलिने गावकऱ्यांना सोयी सुविधा पुरविने आवश्यक होते. मात्र वेकोलिने केवळ दुष्परीणामच गावकऱ्यांच्या माथी मारल्याने गोवरीवासीयांचा संघर्ष गेल्या ३० वर्षापासून आजही कायम आहे.
राजुरा तालुक्यापासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेले व वेकोलिच्या कुशीत वसलेले गोवरी हे चार हजार लोकसंख्येचे गाव. गावाच्या सभोवताल वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे आहे. अगदी गावालगत असलेल्या कोळसा खाणींमुळे गावकऱ्यांना वेकोलिचे दुष्परिणाम सहन करावे लागत आहे. वेकोलितील शक्तिशाली ब्लॉस्टिंगने येथील नागरिकांचे आयुष्यच हादरले आहे. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात वेकोलि प्रशासन हयगत करीत आहे.
गोवरी गाव हे वेकोलिच्या डेंजरझोन परिसरात येते. कोळसा खाण परिसरातील गावांचा विकास व्हावा, यासाठी वेकोलिने परिसरातील गावांना दत्तक घेतले आहे. वर्षभरात गावकऱ्याच्या भल्यासाठी वेकोलिने विविध योजना राबविणे आवश्यक आहे. मात्र थातूरमातूर विकासकामे करुन गावाची विकासाकडे वाटचाल होणार कशी, हे वेकोलि प्रशासनाला सांगणार कोण?
वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे गोवरीगावालगत असलेल्या नाल्याच्या किणाऱ्यावर टाकले आहे. पावसाळ्यात या गावाला बँकवॉटरचा फटका बसतो. मातीच्या ढिगाऱ्याला पाणी अडून गोवरी गावात पाणी फेकले जाते. क्षणार्थात संसार पाण्यावर तरंगायला लागतो. हे सारे वेकोलिचे दुष्परीणाम आहे. मात्र गावकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायला वेकोलिच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडे वेळ नाही. वेकोलिने वर्षाकाठी करोडो रुपयाचा नफा कमवायचा आणि वेकोलिने दुष्परिणाम गावकऱ्यांच्या माथी मारायचे, असा ३० वर्षापासून चालत आलेला अलिखित नियम आजही कायम आहे. मात्र वेकोलिने घालून दिलेला नियम तोडण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने साधा प्रयत्नसुद्धा केलेला नाही. कोळसा खाण परिसरातील गोवरी हे लोकसंख्येने मोठे गाव आहे. मात्र या गावाची समस्याही आता लहान राहिली नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले.