वादळामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान
By Admin | Updated: May 30, 2017 00:32 IST2017-05-30T00:32:18+5:302017-05-30T00:32:18+5:30
शनिवारी जिल्ह्यात काही भागात वादळाने थैमान घातल्यानंतर रविवारीसुद्धा सायंकाळच्या सुमारास वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

वादळामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान
वीज पुरवठा खंडित : अनेक घरांचे छत उडाले, झाडेही उन्मळून पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शनिवारी जिल्ह्यात काही भागात वादळाने थैमान घातल्यानंतर रविवारीसुद्धा सायंकाळच्या सुमारास वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे चंद्रपूरसह जिल्ह्याभरात अनेक ठिकाणची झाडे कोसळली, विद्युत खांब कोसळले, अनेकांच्या घरावरील छत उडाले. त्यामुळे रविवारच्या वादळाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सगळीकडे नवतपाचे चटके बसत असताना जिल्ह्यात शनिवार व रविवारी सायंकाळपासून वादळाने थैमान घातले. चंद्रपुरात रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक वादळ सुटले. जवळपास १५ मिनिटे केवळ वादळ घोंगावत राहिले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. या वादळामुळे व्यावसायिकांचे बॅनर, बोर्ड उडून गेले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर वीज ताराही तुटल्या. परिणामी वीज पुरवठा खंडित झाला. हॉस्पीटल वॉर्डातील काही भागात रात्रभर वीज गूल होती. त्यामुळे चिमूर तालुक्यातील भिसी येथील अनेकांच्या घरांची छते उडाली. तर शनिवारला भिसी येथील बाजार असल्याने अनेक व्यापारी व किरकोळ व्यावसायिकांचे नुकसान झाले. रविवारच्या वादळी पावसाने मूल-गडचिरोली मार्गावरील विजेचे खांब पूर्णपणे वाकले. त्यामुळे मूलमध्ये वीजपुरवठा बराच वेळ खंडीत झाला होता. कोरपना तालुक्यातही रविवारला मोठ्या प्रमाणात वादळ वाऱ्यासह पाऊस आला. त्यामुळे कोरपना, कन्हाळगाव, पारडी, गेवरा आदी ठिकाणच्या घराचे छत उडून गेले. तर सावली तालुक्यातील निफ्रंदा येथील मारोतराव भांडे, मिराबाई भांडे यांच्या घरावर चिंचेचे झाड पडल्याने त्याचे घर जमीनदोस्त झाले. तर अंबादास लाडवे यांच्या बैलावर टिनाचे पत्रे पडल्याने बैल जखमी झाला. तर ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव परिसरातील अनेकांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडाले.