वादळ व अवकाळी पावसामुळे कोरपना तालुक्यात मोठे नुकसान
By Admin | Updated: May 13, 2017 00:37 IST2017-05-13T00:37:50+5:302017-05-13T00:37:50+5:30
कोरपना तालुक्यातील निमणी परिसरातील गावात गुरूवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे व जोरदार पावसाने गावातील ५० टक्के घरांवरील छप्पर उडून गेल्याने मोठे नुकसान झाले.

वादळ व अवकाळी पावसामुळे कोरपना तालुक्यात मोठे नुकसान
शेतकऱ्यांनाही फटका : अनेक घरांची अंशत: पडझड
लोकमत न्यूज नेटवर्क
बाखर्डी :कोरपना तालुक्यातील निमणी परिसरातील गावात गुरूवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे व जोरदार पावसाने गावातील ५० टक्के घरांवरील छप्पर उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. या घटनेत टिनपत्रे उडाल्यामुळे काही जनावरेदेखील जखमी झाली आहेत.
वादळासोबतच पावसानेदेखील सुमारे एक तास हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. राजकुमार गौरकार व इतर शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेले अन्नधान्य ओले झाले. अनिल जगताप यांचा कापसाचा ढिग बाहेर असल्याने वादळामुळे उडून गेला तर काही ढिगारे जमीनदोस्त झाले. तुकाराम बांदुरकर यांच्या सुमो या वाहनावर झाड पडल्याने काचा फुटल्या. रेणुका लोखंडे या ८० वर्षीय वृध्देच्या घराचे छप्पर उडाले. सुदैवाने जिवितहानी झाली नाही.
प्रचंड वेगात वादळ आल्याने अतिशय जुने झाड घरावर कोसळले. या वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. गावातील जवळजवळ ५० टक्के लोकांच्या घरांवरील छप्पर या वादळामुळे उडाले. अनेक नागरिकांची मातीची घरे आहेत. वादळ व पावसामुळे या घराच्या मातीच्या भिंती जमीनदोस्त झाल्या. गावातील विद्युत खांबसुद्धा वाकल्याने विजेच्या तारा जमिनीवर कोसळल्या. त्यामुळे वीज वितरण कंपनीचेही नुकसान झाले आहे.
चक्रीवादळामुळे मोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे निमणी-राजुरा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. निमणी, बाखडीॅ, लखमापूर, धुनकी या गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. काही तासानंतर हा वीज पुरवठा पूर्ववत झाला. अनेक ग्रामस्थ आपल्या घरावरील उडालेल्या छपराचा शोध घेत होते. अनेकांच्या घरातील टी.व्ही.,फ्रीजसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे नुकसान झाले.
या प्रकारामुळे नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणेने आपल्या अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करावे व तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अन्यधान्याचे नुकसान
चक्रीवादळ व पावसामुळे लोकांच्या घरावरील छप्पर उडाल्यामुळे घरातील साठवून ठेवलेले गहू, तांदूळ व इतर अन्नधान्य ओले झाले. काही मोटरसायकल, सुमो गाडीच्या काचा फुटल्या. बाहेर ठेवलेला शेतकऱ्याचा कापूस वादळामुळे उडून गेला तर काही ओला होऊन जमनीदोस्त झाला. मोठे नुकसान झाले असल्यामुळे शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी निमणी, बाखडीॅ, हिरापूर, धुनकी, तळोधी येथील शेतकऱ्यानी केली आहे.