शेतकऱ्यांसाठी भूमिपुत्रांनी पुढाकार घ्यावा
By Admin | Updated: March 21, 2017 00:39 IST2017-03-21T00:39:15+5:302017-03-21T00:39:15+5:30
शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भूषणावह नाहीत. देशाचा पोशिंदाच जर खचत गेला तर समाजात भयाण परिस्थिती निर्माण होईल.

शेतकऱ्यांसाठी भूमिपुत्रांनी पुढाकार घ्यावा
मान्यवरांचा सूर : चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रातील कोणत्याच घटकासाठी भूषणावह नाहीत. देशाचा पोशिंदाच जर खचत गेला तर समाजात भयाण परिस्थिती निर्माण होईल. शेतकरी माझा आहे. त्यांच्या दु:खाची समरस व्हावे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता भूमिपूत्रांनी समोर यावे, असा सूर रविवारी चंद्रपूर येथे आयोजित अन्नत्याग आंदोलनात उमटला.
शेतकऱ्यांप्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी येथील किसानपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून अन्नत्याग उपोषण करण्यात आले. याची सांगता रविवारी सायंकाळी इन्स्पायर इन्स्टिट्यूट येथे झाली. किसानपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल, रवी झाडे, प्रा. सुरेश चोपणे, उमाकांत धांडे, प्रशांत आर्वे, सचिन भोयर, प्रा. सुनील वडस्कर, प्रणय काकडे, अजय बलकी, पांडुरंग गावतुरे, विनोद थेरे, संतोष ताजणे, नीतेश खामनकर, गजानन नागपूरे, सुधाकर खरवडे, दीक्षांत पथाडे, प्रदीप उमरे, देवानंद वाढई, सुरेश विधाते यांची उपस्थिती होती.
१९ मार्च १९८६ ला यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली. राज्यातील ही पहिली शेतकरी आत्महत्या होती. त्यानंतर लाखों शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीला आणि आत्महत्येला सिलिंगचा कायदा, अत्यावश्यक वस्तूचा कायदा, जमीन अधिग्रहणाचा कायदा जबाबदार आहेत. या कायद्यांचा निषेध व शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी या उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या कामाच्या ठिकाणी अन्नत्याग करण्याचे आवाहन किसानपुत्र फाउंडेशनने केले होते. याला प्रतिसाद देत अनेकांनी अन्नत्याग केले. सायंकाळी ५ वाजता इन्स्पायर इन्स्टिट्यूट येथे अन्नत्याग उपोषणाची सांगता झाली. व्यवस्था बदलणार नाही तोपर्यंत परिवर्तन शक्य नाही. त्यामुळे परिवर्तन करण्यासाठी आता भूमिपूत्रांनी समोर यावे. शेतकऱ्यांना जागृत करण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. मान्यवरांची यावेळी भाषणे झाली. शेवटी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली.